
वेंगुर्ला : सत्य, प्रामाणिक निष्ठा व कठोर म़ेहनतीने मिळविलेले यश हे सर्वोत्तम यश असून ते जीवनात अखंड टिकते. सदविचार, सदाचार व सद्गुण ही आपल्या जीवनात उर्जेसारखे कार्य करून आपल्याला उन्नतीसाठी यश व समाधान देतात. अणसूर- पाल हायस्कुल सारख्या ग्रामीण भागातील शाळेची दहावीत १००% निकालाची उज्ज्वल परंपरा व विद्यार्थ्यांनी मिळविलेले सर्वोत्तम गुण कौतुकास्पद व अभिनंदनीय आहेत असे गौरवोद्गार उद्योजक विनायक कारभाटकर यांनी अणसुर येथे विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात काढले.
अणसूर पाल विकास मंडळ मुंबई संस्थेच्यावतीने, अणसूर पाल हायस्कूल, अणसूर या शाळेतील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांंचा गुणगौरव सोहळा शाळेच्या बहुउद्देशीय हाॅलमध्ये उत्साहात संपन्न झाला. यावेळी संस्था अध्यक्ष आत्माराम गावडे, सेक्रेटरी लिलाधर गावडे, प्रमुख पाहुणे मया गोवा येथील उद्योजक विनायक कारभाटकर, शालेय समिती चेअरमन एम.जी.मातोंडकर, सदस्य दिपक गावडे, देवू गावडे, विजय गावडे, गुंडू गावडे, भाऊ गावडे, अणसूर सरपंच सत्यविजय गावडे, पाल सरपंच कावेरी गावडे, जनशिक्षण संस्थेचे गजानन गावडे, माजी मुख्याध्यापक शैलजा वेटे, सेवानिवृत्त लिपिक सुधीर पालकर व रूचिरा पालकर,/वासुदेव बर्वे , नारायण ताम्हणकर, बिटू उर्फ आनंद गावडे, अनंत मांजरेकर, ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष आत्माराम गावडे यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करुन भावी जीवनात आपल्या आवडत्या क्षेत्रात सर्वोत्तम यश मिळविण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन केले. तसेच सचिव लिलाधर गावडे, चेअरमन माजी मुख्याध्यापक एम.जी.मातोंडकर, अणसूर सरपंच सत्यविजय गावडे, पाल सरपंच कावेरी गावडे, भाऊ गावडे, गुंडू गावडे यांनीही विद्यार्थी व शिक्षक परीवाराचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी अणसूर पाल विकास मंडळ मुंबई संस्थेच्यावतीने , वेंगुर्ला तालुक्यात आठवा आलेल्या व शाळेत प्रथम क्रमांक पटकाविलेल्या मंदार बापू नाईक, द्वितीय क्रमांक यज्ञेश भास्कर गावडे, तृतीय क्रमांक भुमिका अनंत राऊळ यांचा भेटवस्तू देऊन सन्मान केला. तसेच शाळेतील सर्वच गुणवंत व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी संस्थेच्यावतीने सर्व शिक्षकांचा गौरव करण्यात आला. संस्थाध्यक्ष आत्माराम गावडे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जीवन विद्या मिशन पुस्तिका भेट दिली. सेवानिवृत्त लिपिक सुधीर पालकर यांचा सेवानिवृत्तिनिमित्त संस्थेच्यावतीने शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यावतीने बुद्धमूर्ती व भेटवस्तू देण्यात आली. सुधीर पालकर यांनी संस्था व शालेय परिवाराचे आभार मानून, संस्थेला रूपये पंचवीस हजारचा धनादेश दिला व सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना भेटवस्तू दिली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांनी मनोगतात आपल्या शैक्षणिक, कला - सांस्कृतिक व क्रीडा विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व संस्थचे ऋण व्यक्त करून आभार मानले.
या गुणगौरव सोहळ्याचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक राजेश घाटवळ, सुत्रसंचालन विजय ठाकर , गुणगौरव अहवाल वाचन चारुता परब व आभार अक्षता पेडणेकर यांनी मानले.