
कुडाळ :
निवडणुकीच्या रणधुमाळीत कुडाळ तालुक्यात आज पहिली महत्त्वाची घडामोड घडली आहे. तालुक्यातून आज पहिला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला असून, त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.
दुपारी दोनच्या सुमारास अर्ज दाखल
आज दुपारी ठीक २:०० वाजण्याच्या सुमारास निवडणूक कार्यालयात पहिला अर्ज दाखल करण्यात आला. भानुदास सूर्यकांत रावराणे (रा. डिगस) यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी ऐश्वर्या काळुसे आणि तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे अधिकृतपणे सुपूर्द केला.
विशेष म्हणजे, पहिला अर्ज कोणत्याही राजकीय पक्षाकडून नसून तो अपक्ष म्हणून दाखल करण्यात आला आहे. २८-पावशी जिल्हा परिषद मतदारसंघासाठी भानुदास रावराणे यांनी ही उमेदवारी दाखल केली आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारांना अद्याप पक्षाचे अधिकृत ‘एबी फॉर्म’ न मिळाल्याने आज एकाही पक्षीय उमेदवाराने अर्ज भरलेला नाही. परिणामी, एका अपक्ष उमेदवाराने बाजी मारत तालुक्यातून पहिले खाते उघडले आहे.
उद्यापासून ‘शक्तिप्रदर्शनाची’ शक्यता
आज केवळ एकच अर्ज दाखल झाला असला तरी उद्यापासून चित्र बदलण्याची चिन्हे आहेत. बहुतांश पक्षांचे एबी फॉर्म आज संध्याकाळपर्यंत मिळण्याची शक्यता असून, उद्या (बुधवारी) उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक कार्यालयाबाहेर उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची ‘तुफान गर्दी’ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.










