तळवडे भापजला स्थानिक उमेदवार सापडेना ?

उमेदवार आयात करण्याची वेळ ?
Edited by: विनायक गांवस
Published on: January 20, 2026 14:12 PM
views 150  views

सावंतवाडी : तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघ चर्चेत आला असून भाजपकडून‌ या मतदारसंघावर दावा केला आहे. मात्र, भाजपला इथे स्थानिक उमेदवार सापडत नसल्याने आयात उमेदवार देण्याची वेळ आली आहे. तर काही निष्ठावंत इच्छुक कार्यकर्त्यांना डावलल गेल्याने निष्ठेच रूपांतर अश्रूत झाल्याचे पाहायला मिळत आहे. इथे भाजपकडून संदीप गावडे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. स्थानिकांना डावलून आयात उमेदवार दिल्याने येणाऱ्या काळात राजकारण चांगलच तापणार आहे. 

संदीप गावडे हे भाजपचे युवा नेते असून पंचायत समिती सदस्य राहीले आहेत. आंबोली मतदारसंघातून ते जिल्हा परिषदेसाठी इच्छुक होते. मात्र, महिला आरक्षण पडल्यानं त्यांचा पत्ता कट झाला. यानंतर त्यांनी इतर मतदारसंघात चाचपणी केली. तळवडे मतदारसंघातून त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. या मतदारसंघात स्थानिकांना संधी मिळावी यासाठी अनेकजण इच्छुक होते. मात्र, निष्ठावंतांना डावलून पक्षानं आयात उमेदवार दिल्याने नाराजी निर्माण झाली आहे. स्थानिकांकडून इथे बंडाच निशाण फडकवल जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात इथल राजकारण पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

या राजकीय संघर्षात भरीस भर म्हणून शिवसेनेतील इच्छुकांची नाराजी निर्माण झाली आहे. जागावाटपाच्या गणितात ही जागा भाजपकडे गेल्याची जोरदार चर्चा आहे. अशा परिस्थितीत इच्छुक असलेले शिवसैनिक नेमकी कोणती  भूमिका घेतात ? हे महत्वाच ठरणार आहे. तसेच दुसरीकडे ठाकरे शिवसेनेने या संधीचा फायदा घेण्यासाठी कंबर कसली आहे. ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख, नेमळे गावचे सुपुत्र रुपेश राऊळ हे स्वतः या निवडणुकीत आपले नशीब आजमावण्याची दाट शक्यता आहे.  त्यांनी जोरदार पूर्वतयारीही सुरू केल्याचे समजत आहे. त्यामुळे त्यांचीही भुमिका निर्णायक ठरणार असून तळवडेतील राजकारण मात्र चांगलच तापणार आहे.