आई-वडील, शिक्षकांच्या भावनांचा आदर करणारे विद्यार्थी आदर्श राष्ट्रनिर्मिती करतात! - - प्रा. रूपेश पाटील

- मिलाग्रीस हायस्कूलमध्ये बालदिन उत्साहात साजरा
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 14, 2022 13:22 PM
views 191  views

सावंतवाडी :  बाल मन हे अत्यंत निरागस, निर्मळ आणि स्वच्छंदी असते. या वयात आलेले संस्कार चिरकाल टिकणारे असतात. म्हणूनच बाल वयात संस्काराचे महत्त्वाचे केंद्र ही शाळा असते. शाळेतून मिळालेले संस्कार आपल्या आयुष्याला यशस्वी बनविण्यासाठी मौलिक ठरतात. जी बालके आई-वडील आणि गुरुवर्य यांचा आदर करतात त्यांच्या भावनांची कदर करतात, ते स्वतः तर घडतात, परंतु आपल्या राष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी त्यांची मौलिक भूमिका महत्त्वपूर्ण ठरते, असे प्रतिपादन प्रा. रुपेश पाटील यांनी येथे व्यक्त केले.

 शहरातील मिलाग्रीस हायस्कूल येथे बाल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा. रुपेश पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य रिचर्ड सालढाणा, सिस्टर कार्व्हालो, मेघना राऊळ आदी उपस्थित होते.

प्रारंभी प्राचार्य फादर सालढाणा व मान्यवरांच्या हस्ते भारताचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर प्रा. पाटील यांचे 'संस्कार' या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. यावेळी प्राध्यापक पाटील म्हणाले, आपल्या भारतीय संस्कृतीत संस्कारांचे अनन्यसाधारण महत्त्व असून बालवयात आई आपला प्रथम गुरु असते. तीच आपल्यावर जीवनोपयोगी संस्कार बिंबवते. पुढे त्या संस्कारांना योग्य पद्धतीने अमलात आणण्यासाठीचे महत्वाचे कार्य शाळा करत असते. म्हणून शाळा आणि घर यातून मिळालेले संस्कार आपल्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख निर्माण करतात. अलीकडे विद्यार्थी, शिक्षक व पालकांचा अनेकदा अनादर करतात. हे अत्यंत चिंताजनक असून आई - बाबा आणि आपले गुरुवर्य यांच्या भावना कधीही दुखवू नका, असेही प्रा. पाटील म्हणाले.

 

प्राचार्य, शिक्षकांनीही जिंकली बालमने 

दरम्यान व्याख्यानानंतर फादर रिचर्ड  सालढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. यात स्वतः फादर यांनी आपल्या गायनातून विद्यार्थ्यांना नृत्य करण्यास भाग पाडले. शाळेतील शिक्षिकांनीही बहारदार नृत्य सादर केले. तसेच सहाय्यक शिक्षकांनी सादर केलेले 'कसं काय मास्तर बरं हाय का!' या विनोदी नाट्याने बालदिनाची रंगत एका वेगळ्या उंचीवर नेली. सूत्रसंचालन अँटोनेट पिंटो यांनी केले. शेवटी सहाय्यक शिक्षक गणेश डिचोलकर यांनी आभार मानले.

कार्यक्रमास शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.