तब्बल 3 तास विद्यार्थी अडकून पडले

घाटात दरड कोसळली
Edited by: मनोज पवार
Published on: July 03, 2025 15:27 PM
views 1032  views

खेड : रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या रघुवीर घाटात बुधवार दि.२ रोजी मध्यरात्री दरम्यान पुन्हा एकदा दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली. चार दिवसांत हा दुसरा प्रकार घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

दरड कोसळल्यामुळे गुरुवारी दि.३ रोजी सकाळी अकल्पे येथून खेडकडे येणारी एसटी बस घाटातच अडकून पडली होती. या बसमध्ये खेड तालुक्यातील खोपी येथील शाळेत जाणारे विद्यार्थीही होते. या विद्यार्थ्यांना तब्बल तीन तास बसमध्ये अडकून राहावं लागलं.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून दरड हटवण्याचे काम सुरू केले. अकराच्या सुमारास दरड हटवण्यात आल्याने वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.

दरड हटविल्यानंतर सकाळी ८.३० वाजता खेडमध्ये पोहोचण्याची अपेक्षा असलेली बस तब्बल तीन तास उशिराने, म्हणजे ११.३० वाजता खेड बसस्थानकात पोहोचली. या संदर्भात माहिती देताना खेड आगाराचे व्यवस्थापक रणजीत राजेशिर्के यांनी ही माहिती दिली.

रघुवीर घाटातील वारंवार होणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये अस्वस्थता वाढली असून, प्रशासनाने या भागातील सुरक्षेची अधिक प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे.