
कणकवली : विद्यार्थ्यांनी यशात सातत्य कायम राखून आपल्या विकासासह शाळेचे व देशाचे नाव उंचवावे. शालेय जीवनात कष्ट करून शिक्षणावर लक्ष केंद्रित करा असे प्रतिपादन आय.टी.एम.कौशल्य विद्यापीठ ,खारघरचे कुलगुरु डॉ.जयवंत शेलार यानी केले.नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षणसंस्था संचलित सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे एस. एस.सी परीक्षा २०२४ मध्ये आठवी,नववी पेक्षा २० टक्के अधिक गुण मिळवणा-या विद्यार्थी प्रोत्साहन सोहळ्यात मार्गदर्शन करताना बोलत होते.
विद्यार्थी प्रोत्साहन सोहळ्याचा शुभारंभ डाॅ.जयवंत शेलार याच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा माजी जि.प. सभापती नागेश मोरये,नांदगाव विकास मंडळाचे अध्यक्ष गजानन रेवडेकर,मुख्याध्यापक सुधीर तांबे,खजिनदार सुभाष बिडये, नांदगाव केंद्रशाळा मुख्याध्यापक सुहास सावंत,उर्दू शाळा मुख्याध्यापक ऐनुद्दीन शेख,शिक्षक कविता नलावडे, शर्वरी सावंत, हरिदास खराडे, विलास तांबे, श्रीकांत सावंत, राजेश नारकर,संजय सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डाॅ.शेलार म्हणाले, विद्यार्थ्यांनी ज्ञान किती घ्यावे हे स्वतः ठरवावे कारण शिक्षण हे पाण्याच्या प्रवाहासारखे असते. त्यातील पाणी किती प्यावे हे आपण ठरवून तशा प्रकारे प्रगती साधावी. मुलांनी व शिक्षकांनी शाळेची प्रगती करावी असे सांगत मुलांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नागेश मोरये म्हणाले, शालेय उपक्रम राबवले तर विद्यार्थी पुढे जातात.मात्र यासाठी टक्केवारी मिळवून सातत्य कायम राखले पाहिजे.
तर गजानन रेवडेकर यानी विद्यार्थ्यांनी ऋणानुबंध वाढवून समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करावे.असे सांगत ज्या क्षेत्रात काम कराल तिथे आपल्या नावासह शाळेचे नाव उज्ज्वल करा. यावेळेस आठवी, नववी, दहावी गुणाची सरासरी राखून २० टक्के वाढीव गुण मिळवणारे,सिद्धिका साठविलकर,सुजल तोडणकर,सुजल वाळवे,गौरव तांबे या विद्यार्थ्यांसह इंग्रजी शिक्षक श्रीकांत सावंत,गणित शिक्षक रघुनाथ कारेकर, मुख्याध्यापक सुधीर तांबे याचा प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तर डाॅ. जयवंत शेलार याच्या विशेष सत्कार करून उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय सावंत यानी मानले.