विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाऐवजी वास्तव जीवन जगावे : रमाकांत खलप

Edited by: संदीप देसाई
Published on: February 06, 2024 09:10 AM
views 141  views

दोडामार्ग : विद्यार्थ्यांनी सोशल मीडियामध्ये रममाण होऊन स्वप्नरंजन जीवन जगण्यापेक्षा परस्थितीचे भान ठेऊन वास्तव जगावे तरच जीवनात यशस्वी होऊ  शकतो असे प्रतिपादन माजी केंद्रीय कायदा राज्यमंत्री रमाकांत खलप यांनी केले. दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नाट्यकर्मी विजय चव्हाण, भाई परमेकर, विवेकानंद नाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत आदि होते.

आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की, एकदा अपयश आलं म्हणून थांबलं तर जीवनात कधीच पुढे जाऊ शकणार नाही. त्यासाठी अपयशावर मात करता आली पाहिजे. जीवनात चढ उतार येतच असतात ते पचवायला शिकले पाहिजे. येणाऱ्या प्रसंगाला परिस्थितीनुसार तोंड दिलच तरच मोठे होऊ शकतो. येणाऱ्या काळात जमीन आणि पाणी कमी पडणार आहे. त्यासाठी त्याचे रक्षण करणे गरजेचे आहे. मी केंद्रात मंत्री असताना संसदेत महिलासाठी राखीव जागाचे विधेयक मांडले होते.

पुढे ते लागू झाले. त्याचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी महिला पुढे आल्या पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी नाट्यकर्मी  विजय चव्हाण म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली असते. त्याचे त्यांनी सोने केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी संस्कारक्षम झाले पाहिजे. विद्यार्थी हा  माणूस बनला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत अध्यक्षीय  समारोप करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवावे. त्यासाठी वेळेचा सदुपयोग करावा. यावेळी डॉ. पी. डी. गाथाडे, डॉ. प्रशांत ढेपे, प्रा.रामकिशन मोरे, योगेश ठाकूर या प्राध्यापक कर्मचाऱ्यांबरोबरच महिमा गवस, प्रतीक्षा नाईक, गौरेश नाईक, माधवी गवस, यांचा विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ .पी. डी. गाथाडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संजय खडपकर यांनी केले. तर उपस्थित आमचे आभार डॉ.सोपान जाधव यांनी मानले.