
देवगड : देवगड येथील शेठ म.ग हायस्कूल मध्ये बाल दिनाचे औचित्य साधून निळकंठ श्रीधर दीक्षित स्मरणार्थ दीक्षित फाउंडेशन पुरस्कृत आणि शाळेतील इतिहास विषय समिती आयोजित किल्ले बनविणे स्पर्धा व प्रदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापक प्रवीण खडपकर यांच्या हस्ते करण्यात आले.
ही स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी आणि इयत्ता आठवी ते नववी अशा दोन गटांमध्ये घेण्यात आलेली होती. एकूण 16 किल्ल्यांचा समावेश या स्पर्धेमध्ये होता. या प्रदर्शनाला स्थानीय समितीचे सचिव ॲड. अविनाश माणगावकर यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनातून प्रोत्साहित केले. यावेळी त्यांनी या स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांनी बनविलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृतींची माहिती घेतली.
"विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील दुर्गांचा व किल्ल्यांची माहिती घ्यावी. इतिहास जाणून घ्यावा. शिवाजी महाराजांची युद्धनीती जाणून घ्यावी."असे मार्गदर्शन पर उद्गगार त्यांनी काढले. विद्यार्थ्यांनी किल्ल्यांच्या उत्तम उत्तम केलेल्या प्रतिकृतींचे, विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे कौतुक केले.
यावेळी मुख्याध्यापक प्रविण खडपकर यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे तसेच पालकांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल व सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. या स्पर्धेचे प्रायोजक निरंजन दीक्षित यांनी या स्पर्धेची बक्षिसे पुरस्कृत केल्याबद्दल शाळेमार्फत त्यांचेही मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
तसेच पर्यवेक्षिका निशा दहिबावकर, इतिहास विषय समिती प्रमुख आफरीन पठाण यांचे देखील या किल्ले बनविणे स्पर्धेला मोलाचे सहकार्य लाभले परीक्षक म्हणून स्वप्निल सुतार लाभले तर या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समिती प्रमुख आफरीन पठाण यांनी केले.











