शाळा बंद आंदोलनाची विद्यार्थी, पालकांवर नामुष्की

Edited by: विनायक गावस
Published on: July 24, 2023 15:13 PM
views 415  views

सावंतवाडी : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आंबेगाव न.1 येथे आज शाळा बंद आंदोलन करण्यात आले आहे. मुलांना शाळेच्या अंगणात बसवून पालकांनी शाळा बंद केली. 

जि.प.पू.प्रा. शाळा आंबेगाव नं. १ ही एक उपक्रमशील व शैक्षणिक दृष्ट्या प्रगत असलेली शाळा असून या शाळेची पटसंख्या ही नेहमी ८० ते ९० च्या दरम्यान असते. पण गेली तीन ते चार वर्षे या शाळेत एकच पदवीधर शिक्षक कार्यरत होते. यावर्षी झालेल्या जिल्हांतर्गत ऑनलाईन बदल्यांमध्ये दोन पदवीधर शिक्षक शाळेत हजर झाले. त्यामुळे गावात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. पण शिक्षण विभागाने शाळेच्या पहिल्या दिवशीच आमच्या शाळेतील श्रीम. रसिका रामचंद्र नाईक या पदवीधर शिक्षिकेस आदेश काढून केवळ ३३ पटसंख्या असलेल्या जि.प.पू.प्रा. शाळा कुणकेरी नं. १ येथे कामगिरीवर पाठवले. वीस दिवस तात्पुरत्या कालावधीसाठी हि नियुक्ती केली होती. मात्र, एक महिना पण पूर्ण झाला तरी  आंबेगाव शाळा न 1 येथील शिक्षिकेस अद्याप पुन्हा न पाठवल नसल्यानं आज पालक व ग्रामस्थ यांनी शाळा बंद करून मुलांना अंगणात बसवले आहे.

जोपर्यंत कामगिरीवर पाठवलेल्या शाळेतील पदवीधर शिक्षिका पुन्हा आपल्या मूळ शाळेत हजर होत नाहीत तोपर्यंत आम्ही बेमुदत शाळाबंद आंदोलन करू. पुढे होणाऱ्या सर्व परिणामांस शासन जबाबदार राहील असा इशारा स्थानिक पालकांनी दिलाय.