
मंडणगड : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नुकतेच गुणवत्ता हमी कक्ष अंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्यावतीने मडणगड नगर पंचायतचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांचे ‘स्पर्धा परीक्षा : विविध संधी’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर होते. यावेळी डॉ. सुरुवातीला प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून अभिजीत कुंभार यांचे स्वागत करण्यात आले. स्पर्धा परीक्षा विभागप्रमुख डॉ. भरतकुमार सोलापूरे यांनी कार्यकमाचे प्रास्ताविक केले तर डॉ.विनोदकुमार चव्हाण यांनी अभिजित कुंभार यांची थोडक्यात ओळख करुन दिली.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना अभिजीत कुंभार म्हणाले की, ग्रामीण भागात राहणा-या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा हे एक उत्तम क्षेत्र आहे. कारण स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून तालुका तसेच जिल्हास्तरावर अधिकारी होण्याची संधी मिळते. यासाठी ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षांचे बीज रूजणे अतिशय आवश्यक आहे. जिददीने अभ्यास केला तर कोणत्याही परिस्थितीत स्पर्धा परीक्षेत नक्की यश मिळविता येते. इंटरनेटचा प्रसार ग्रामीण भागातही झाल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास-साहित्याची कमतरता भासणार नाही. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाची व विचारांची मर्यादा वाढवणे आवष्यक असून आपल्याला कोणत्या क्षेत्रात जायचे आहे हे आधी ठरवून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. विनोदकुमार चव्हाण यांनी तर आभार डॉ. मुकेश कदम यांनी केले.