
कणकवली : कणकवली येथील बस स्थानकातून कुंभवडे शंकर महादेव विद्यालय (कणकवली - कुंभवडे) अशी सकाळी ६ वाजता सूटणारी बस शनिवारी नेहेमीच उशिरा येते. विद्यार्थी या बसची दर शनिवारी वाट पाहत बसलेले आहेत. मागणी करूनही बस वेळेत सोडली जात नसल्याने आज विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी त्या विद्यार्थ्यांसोबत पालक व शिक्षक देखील होते. संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी एसटी प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करत कणकवली बस स्थानकातील बस शनिवारी सकाळी ८ वाजता रोखून धरल्या होत्या.
दरम्यान शनिवारी इयत्ता पाचवी ते नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा असताना देखील बस वेळेत सोडली नाही. एसटी प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे याचे शैक्षणिक नुकसान होत आहे, अशी संतप्त प्रतीक्रिया देखील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. दरम्यान यावेळी एसटी बस स्थानकातील वातावरण तणावपूर्ण बनले होते.
विद्यार्थ्यांना बस स्थानकात बस रोखून धरले तरी जबाबदार एसटीचे अधिकारी मात्र तिथे बराच वेळ उपस्थित नव्हते.
दरम्यान या एकंदरीत प्रकारानंतर कणकवली बस स्थानकात पोलीस दाखल झाल्यावर एसटीचे श्री. गायकवाड संतप्त विद्यार्थ्यांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी दाखल झाले होते. यावेळी बस फेरीचे दैनंदिन नियोजन रजिस्टर ला नोंद करताना कणकवली - कुंभवडे बस फेरीचे नोंद करणे राहून गेले. यानंतर काळजी घेतली जाईल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असा विश्वास देखील यावेळी देण्यात आला. पर्यायी बस उपलब्ध करून दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.