
बांदा : बांदा बळवंतनगर येथील गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या पाणी साठवण टाकीला ठिकठिकाणी तडे गेले असून पाणी गळती होत असल्याने ही टाकी धोकादायक बनली आहे. या टाकीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी केली आहे. यासंदर्भात येथील स्वयम सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने ग्रामपंचायतला निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, टाकी धोकादायक असल्याबाबत वेळोवेळी ग्रामपंचायतच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. मात्र याबाबत अद्यापपर्यंत कार्यवाही करण्यात आली नाही. ही टाकी जीर्ण झाल्याने ही दुरुस्ती न करता टाकी बदलणे हाच पर्याय आहे. भविष्यात टाकी कोसळून कोणतीही हानी झाल्यास याला ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहील. यासाठी लवकरात लवकरच योग्य तो निर्णय घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने घ्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.