आपल्या नेत्याला ताकद देण्यासाठी संघटना मजुबत करा : सचिन वालावलकर

म्हापण, आडेली विभागात शिवसेना मतदार नोंदणीला शुभारंभ
Edited by:
Published on: March 21, 2025 18:28 PM
views 234  views

वेंगुर्ला :  गेल्या ३ वर्षात महाराष्ट्रात इतिहास घडून बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार महाराष्ट्रात आले. माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या कालावधीत लोकप्रिय मुख्यमंत्री झाले त्यांनी अनेक योजना जन कल्याणासाठी आणल्या. आता पुन्हा शिवसेना भाजप चे सरकार आले आहे. या मतदार संघात आमदार दीपक केसरकर प्रचंड मताधिक्याने निवडून आले. यामुळे आता आपल्या नेत्यांचे हात बळकट करण्याची गरज आहे. शिवसेना- भाजप महायुतीचे सरकार असले तरी आपली संघटना मजबूत होणे गरजेचे आहे. यामुळे वेंगुर्ला तालुक्यात मतदार नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करून दिपकभाईंना राज्यात ताकद देऊया असे प्रतिपादन शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी म्हापण व आडेली येथील मतदार नोंदणी शुभारंभ कार्यक्रमात केले. 

वेंगुर्ला तालुक्यातील म्हापण व आडेली जिल्हा परिषद मतदार संघात आज (२१ मार्च) शिवसेना सभासद नोंदणी शुभारंभ प्रसंगी सचिन वालावलकर बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, सचिन देसाई, कोस्टल विभाग तालुकाप्रमुख काशिनाथ नार्वेकर, विभागप्रमुख देवदत्त साळगावकर, मितेश परब, आबा कोचरेकर, विलास राऊळ, सुहास मांजरेकर, सुधीर धुरी, अनंत मांजरेकर, बाबली पाटकर, राधाकृष्ण पाटकर यांच्यासाहित प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना सचिन वालावलकर पुढे म्हणाले, शिवसेना बळकट होण्यासाठी एकत्रित प्रयत्न करूया. या मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर विकासाच्या दृष्टीने चांगलं काम करत असताना पक्षाचे सुद्धा काम चांगल्या पद्धतीने करत आहेत. जरी मंत्री नसले तरी मतदार संघात काम करताना प्रत्येक मंत्र्याकडे त्यांची एक वेगळी ओळख आहे. राजकारणात वेळोवेळी बदल होत असतात मात्र प्रत्येक गावचा विकास करायचा असेल संघटना मजबूत करून कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे असेही सचिन वालावलकर म्हणाले. 

तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी बोलताना सांगितले की, वेंगुर्ला तालुक्यात ६ हजार सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेऊन प्रत्येक विभाग निहाय नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक विभागप्रमुखावर जबाबदारी देण्यात आली आहे. तालुक्यातील संघटना अधिक मजबूत करून आमदार केसरकर यांना पुन्हा मंत्री करण्यासाठी एकजुटीने काम करणार असल्याचे मांजरेकर यांनी सांगितले. या सदस्य नोंदणी विभागनिहाय सदस्य नोंदणी कार्यक्रमात उपस्थित पदाधिकारी व शिवसैनिकांना ऑफलाईन फॉर्मचे वाटप करण्यात आले.