
कुडाळ : कुडाळ शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर, विशेषतः कुडाळ येथील आरएसएन हॉटेल चौकात, ही जनावरे रस्त्याच्या मधोमध बसलेली दिसतात. यामुळे वाहन चालकांना मोठा अडथळा निर्माण होत असून, अपघाताची शक्यता वाढली आहे.
सकाळी या चौकात काही जनावरे रस्त्यावर बसलेली होती, ज्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. महामार्गावर २४ तास वाहनांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत जनावरे रस्त्यावर बसल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता असते. या जनावरांना कोणतेही रिफ्लेक्टर किंवा टॅग लावलेले नसल्यामुळे रात्रीच्या वेळी ती अंधारात दिसत नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना अंदाज येत नाही आणि अपघात होऊ शकतात.
सुदैवाने, एका जागरुक नागरिकाने ही बाब लक्षात घेऊन त्या जनावरांना रस्त्यावरून बाजूला केले. या घटनेमुळे माणुसकी आजही जिवंत आहे, हे दिसून आले. मात्र, अशाप्रकारे रोजच कोणीतरी मदत करेल अशी अपेक्षा करणे योग्य नाही.
या घटनेमुळे नगरपंचायतीच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या मोकाट जनावरांना कोंडवाड्यात नेऊन सोडण्याची जबाबदारी नगरपंचायतीची आहे. ही जबाबदारी विसरल्यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. नगरपंचायतीने या समस्येवर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.