
कणकवली : कासार्डे येथील अवैध सिलिका उत्खनन व वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. या भागाची मी पाहणी केली असता या परिसराची अवस्था गाझापट्टीसारखी झाल्याचे दिसून आले. सिलिका उत्खननामुळे पर्यावरणाच्या ऱ्हासासह जलप्रदूषण वाढ होणार आहे. त्याचा फटका कासार्डे व आजूबाजूच्या गावांना बसणार आहे. अवैध सिलिका उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी स्थानिकांनी पुढाकार गरजेचे आहे. अन्यथा त्याचे दुष्परिणाम नागरिकांना भोगावे लागतील. कासार्डेतील अवैध सिलिका उत्खननाचा अभ्यास करून मायनिंगविरोधात कोर्टात दाद मागत आहोत. मायनिंगविरोधात आमचा लढा सुरू असून तो लढत राहणार असल्याचा इशारा पर्यावरणतज्ज्ञ तथा वन्यशक्ती संस्थेचे स्टॅलिन दयानंद यांनी दिला.
येथील विजयभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्टॅलिन दयानंद बोलत होते. यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार वैभव नाईक, धीरज मेस्त्री, संतोष सावंत आदी उपस्थित होते.
स्टॅलिन दयानंद म्हणाले, परशुराम उपरकर व वैभव नाईक यांनी कासार्डेतील अवैध सिलिका उत्खनन व वाहतूक प्रश्नी माझ्याशी चर्चा करून या भागाची पाहणी करण्याची विनंती त्यांनी केली होती. त्यानुसार कासार्डे परिसराची मी पाहणी केली. त्यावेळी अवैध व चुकीच्या पद्धतीने सिलिका उत्खनन व वाहतूक राजरोसपणे दिसून आले. उत्खननामुळे पर्यावरणाच्या र्हासासह जलप्रदूषण वाढणार आहे. त्याचे दुष्परिणाम कासार्डेसह आजूबाजूच्या गावाला भोगावे लागणार आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी वेळीच सावध होऊन अवैध सिलिका उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी लढा दिला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करताना अवैधरित्या सुरू असलेल्या सिलिका उत्खनन व वाहतुकीकडे खनिकर्म अधिकार्यांनी भेट दिली नाही, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
कासार्डेत सुरू असलेल्या अवैध सिलिका उत्खनन आणि सिलिका वॉशिंग प्लांटमुळे जलस्त्रोत दूषित होत आहेत. यापुढील काळात सिलिकाचे उत्खनन व वॉशिंग प्लांट सुरू राहिल्यास या परिसरात लगतच्या गावांमधील जमिनी नापिक होऊन पिण्याचा पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती स्टॅलिन यांनी व्यक्त केली.