
देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीतील खालची बाजारपेठ येथील संरक्षक भिंतीचे काम करताना त्यातून निघालेली माती व दगड तेथील मयुरेश गोखले यांच्या घरासमोर टाकण्यात आले. मात्र, वर्ष होत आले तरी नगरपंचायत प्रशासन अथवा संबंधित ठेकेदाराने तेथील माती व दगड हटविलेले नाही. ही माती व दगड तात्काळ न हटविले गेल्यास २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी येथील न. पं. कार्यालयाच्या आवारात कुटुंबासमवेत उपोषणाला बसण्याचा इशारा मयुरेश गोखले यांनी न. पं. प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.
न. पं. मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात गोखले यांनी म्हटले आहे, फेब्रुवारी महिन्यात नगरपंचायतीमार्फत आपल्या घरासमोर संरक्षक भिंतीचे काम झाले होते. त्यातून निघालेली दगड- माती आपल्या घराच्या आवारात टाकण्यात आली. या कामाला वर्ष होत आले तरीही संबंधित ठेकेदाराने तेथील दगड-माती अद्याप हटविलेली नाही. ही माती व दगड २५ जानेवारीपूर्वी न हटविल्यास प्रजासत्ताक दिनी नगरपंचायत आवारात आपण कुटुंबासमवेत उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गोखले यांनी या निवेदनाची प्रत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, नगराध्यक्षा, देवगड पोलीस निरीक्षक यांनाही पाठविल्या आहेत. या प्रश्नाकडे गोखले यांनी यापूर्वीही न. पं. प्रशासन व संबंधित ठेकेदाराचे लक्ष वेधले होते. मात्र, न. पं. प्रशासनाने त्याकडे कानाडोळा केला. तसेच संबंधित ठेकेदारानेही या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. परिणामी, याचा नाहक त्रास कुटुंबाला सहन करावा लागत असल्याचे गोखले यांनी सांगितले.