
मंडणगड : मंडणगड शहरालगत असणाऱ्या रहदारीच्या ठिकाणी भिंगळोली मध्ये रात्रीच्या वेळेस बसलेल्या गाईगुरांना भुलीचे औषध इंजेक्शन व खाद्यातून खायला देऊन त्यांची चोरी करण्याच्या घटना उघडकीस आलेली आहे. गुरे चोरून नेण्यासाठी चोरट्यांनी चक्क इनोव्हा गाडीचा वापर केल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहे. हि घटना तारीख 6 डिसेंबर 2024 रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास भिंगळोली ते धुत्रोली मार्गावर एका दुकानाच्या लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्या तक्रारी दाखल केल्या आहेत.
अधिक माहितीनुसार मंडणगड तालुक्यामधून काही वर्षांपासून उनाड सोडलेली मोकाट गुुरे गायब होण्याच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे. त्याला या घटणेमुळे दुजोरा मिळाला आहे. सीसीटीव्ही मध्ये दिसून येणाऱ्या चित्रीकरणानुसार, रात्री बाराच्या दरम्यान एक चार चाकी इनोव्हा गाडी या ठिकाणी येऊन थांबते व रस्त्यालगत बसलेल्या गाई गुरांना त्यांचं लक्ष नसताना या गाडीतून उतरलेल्या इसमाने इंजेक्शन मारताना स्पष्ट दिसत आहे. घाबरून ही गाईगुरे जात असताना त्यांना थांबवण्यासाठी दुसरा व्यक्ती आपल्या हातातील पिशवीतून त्या ठिकाणी खाण्यासाठी काही खाद्यपदार्थ फेकतो. यानंतर या जनावरांमध्ये एक शिथीलता आलेली दिसते व ही जनावरे त्याच ठिकाणी धुंद अवस्थेत बसलेली दिसतात. यानंतर ही इनोव्हा गाडी बसलेल्या गाईगुरांच्या ठिकाणी लावून त्यातून उतरलेल्या व्यक्ती या इनोव्हा गाडीमध्ये गुरे भरण्याचा प्रयत्न करतात, गुरे गाडीत भरल्यानंतर हे चोरटे त्या ठिकाणाहून पसार होत असल्याचे दृश्य दिसत आहे. याच ठिकाणी पुढील सकाळी चार वाजेपर्यंत हा शिरस्ता कायम राहिल्याचे दिसत आहे. अंतरा अंतरानंतर पुन्हा ही गाडी त्याच ठिकाणी येऊन या रस्त्यालगत बसलेल्या गाईगुरांना गाडीमध्ये भरून पशार होताना दिसत आहेत.
या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी दि. 7 डिसेंबर रोजी तालुक्यातील नारगोल परिसरामध्ये जनावरांच्या मासाचे तुकडे आणि रक्त पडल्याचे आढळून आल्याची घटना येथील नागरिकांनी पोलिसांच्या निदर्शनात आणून दिली. यानंतर पोलिसांकडून तात्काळ या ठिकाणाची पाहणी केली आहे. दि. 6 डिसेंबर रोजी सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली घटना आणि दि. 7 डिसेंबर रोजी नारगोली परिसरामध्ये परस्पर सबंध आहे एका, याबाबत संशय व्यक्त होत आहे.
मागील दहा वर्षापासून मंडणगड तालुक्यामध्ये असणारे पशुधन चोरीला जात असल्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी आपले पशुधन चोरीला जात असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यामध्ये येऊन दिलेले आहेत. चोरीच्या घटनेला दुजोरा देणाऱ्या कोणताही पुरावा आजपर्यंत प्राप्त झालेला नसल्याने या गंभीर घटनेकडे कोणीही गांभीर्याने पाहिलेले नाही. मात्र दिनांक 6 डिसेंबर रोजी सीसीटीव्ही मध्ये कैद झालेल्या चित्रीकरणामुळे मागील दहा वर्षांमध्ये घडलेल्या घटना या सत्य असल्याचे या घटनेमुळे दुजोरा मिळाला आहे. या घटनेमुळे तालुक्यातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेकडे पोलीस प्रशासन नेमकं कोणत्या दृष्टीने पाहतात याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले असून या गंभीर घटनांना आळा बसावा व असे दुष्यकृत्य करणाऱ्या व्यक्तींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई मागणी शेतकरी करीत आहेत.