परमिट रूम, बार आणि हॉटेल व्यावसायिकांचा राज्यव्यापी बंद

चिपळूण तालुका असोसिएशनचा पाठिंबा
Edited by: मनोज पवार
Published on: July 12, 2025 15:37 PM
views 141  views

चिपळूण : राज्य शासनाच्या दारू विक्रीवरील करवाढ धोरणाच्या विरोधात महाराष्ट्रातील परमिट रूम, बार व हॉटेल व्यावसायिकांनी एकत्र येत १४ जुलै रोजी राज्यव्यापी बंदची घोषणा केली आहे. दारूवरील व्हॅट (VAT) मध्ये दुप्पट वाढ, परवाना शुल्कात १५ टक्क्यांची वाढ, तसेच उत्पादन शुल्कात तब्बल ६० टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याने संपूर्ण हॉटेल व बार उद्योग आर्थिक अडचणीत आला आहे. याच पार्श्वभूमीवर आहार संघटना मुंबई तसेच राज्यातील सर्व जिल्हा हॉटेल संघटनांच्या पुढाकाराने हे आंदोलन हाती घेण्यात आले आहे.

या बंदला चिपळूण तालुका बिअर बार परमिट रूम हॉटेल असोसिएशनने पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. तालुक्यातील सर्व हॉटेल व्यावसायिक सोमवार, १४ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत आपले व्यवसाय बंद ठेवून या आंदोलनात सहभागी होणार आहेत. तसेच प्रांताधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे.

या आंदोलनाबाबत संघटनेचे अध्यक्ष श्री. किशोर रेडीज, उपाध्यक्ष श्री. सुहास चव्हाण, सचिव श्री. प्रथमेश कापडी व खजिनदार श्री. मिलिंद गोंधळी यांनी संयुक्त पत्रकाद्वारे माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की, “राज्य शासनाने लादलेली आर्थिक करवाढ परवडणारी नसून त्यामुळे अनेक हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे हजारो कामगार बेरोजगार होतील. शासनाने त्वरीत निर्णय मागे घ्यावा अन्यथा व्यापक आंदोलन छेडले जाईल.”

या बंदमुळे चिपळूण शहरासह तालुक्यातील सर्व बार, बिअर शॉपी, परमिट रूम, रेस्टॉरंट्स यामध्ये सोमवारच्या दिवशी शुकशुकाट पाहायला मिळणार आहे. नागरिकांनी या बंदची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे.