रोटरीकडून फिजिओथेरपी सेंटरसाठी अत्याधुनिक मशीन..!

Edited by: विनायक गावस
Published on: February 12, 2024 13:16 PM
views 35  views

सावंतवाडी : रोटरी इंटरनॅशनल क्लबच्यावतीने सावंतवाडी येथे फिजिओथेरपी सेंटरसाठी अडीच लाख रुपयांचे अत्याधुनिक मशीन बसवण्यात आले असून याचा लाभ सर्वसामान्यांनी घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे अध्यक्ष सुहास सातोसकर यांनी केले. अल्प दरात सर्वांसाठी ही सुविधा उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. फिजिओथेरपी मोफत तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

या फिजिओथेरपी सेंटरमध्ये शिबिरास २७ जणांनी तपासणी करून घेतली. यावेळी सचिव प्रवीण परब सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अण्णा देसाई अस्थिरोग तज्ञ डॉ. रेवण खटावकर B.P.T. बॅचलर ऑफ फिजीओथेरपी डॉ. एंजेला रॉड्रीक्स, ट्रस्ट सचिव सीए सुधीर  नाईक, भालचंद्र कशाळीकर,दिव्यांग विकास केंद्र - संस्थापक अध्यक्ष - रुपाली पाटील,साईप्रसाद हवालदार, विजय कामत, अॕड. प्रकाश परब, प्रमोद भागवत,दिलीप म्हापसेकर,राजेश पनवेलकर, रोटरीच्या माजी अध्यक्ष डॉ. विनया बाड आनंद रासम आदी उपस्थित होते‌.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे म्हणाले, रोटरी क्लबच्या वतीने विविध उपक्रम साजरे होत असतात. फिजिओथेरपी सेंटर गरजेचे होते आणि ते सुरू करण्यास रोटरीने घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे. तर यावेळी सावंतवाडी पत्रकार संघाचे तालुकाप्रमुख हरिश्चंद्र पवार यांनी रोटरी या सेवाभावी संस्थेकडून विविध उपक्रम होत असतात. या उपक्रमात सावंतवाडी तालुका पत्रकार संघाला सहभागी करून घेतल्याने त्याचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत मिळेल. ज्याप्रमाणे नेत्र तपासणी आणि चष्मे वाटपाच्या कार्यक्रमात 65हून अधिक जणांना मोफत तपासणी सुविधा उपलब्ध करून दिली. अशा उपक्रमाना तालुका पत्रकार संघ नेहमीच सोबत राहून व सहकार्य करेल असा शब्द त्यांनी दिला.

रोटरी क्लबच्या वतीने फिजिओथेरपी सेंटर सुरू करण्यात आले. यासाठी उपयुक्त यंत्रसामग्री आणण्यात आली आहे. याबाबतची माहिती रोटरीच्यावतीने सर्वसामान्यांना देण्याचे आवाहन सिंधुदुर्ग डिजिटल मीडियाचे अध्यक्ष अमोल टेंबकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव प्रवीण परब यांनी केले तर सूत्रसंचालन दिलीप म्हापसेकर यांनी केले.