BREAKING | बांधकाम मंत्र्यांचे 'कडक' आदेश | दोडामार्ग शहरातील राज्यमार्ग 8 दिवसात होणार चकाचक !

नगरपंचायतच्या आंदोलनाची बांधकाममंत्र्यांनी घेतली थेट दखल | आजपासुनच काम सुरू करण्याचे अधिकाऱ्यांना दिले आदेश
Edited by: संदीप देसाई
Published on: February 15, 2023 09:38 AM
views 225  views

दोडामार्ग : दोडामार्ग शहरातून गेलेल्या दोन्ही राज्य मार्गांच्या नूतनीकरणाचे काम बुधवारपासूनच सुरू करा, असे आदेश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्याने मंगळवारी कसई- दोडामार्ग नगरपंचायतचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण व त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी बांधकाम विभागाच्या कार्यालयात छेडलेले ठिय्या आंदोलन मागे घेतले. उपविभागीय अधिकारी अनिल बडे यांना बुधवारपासून दोडामार्ग शहरातील रस्त्यांचे नूतनीकरण सुरू करून येथे आठ दिवसात हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दिली आहे.

दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील दुरवस्था झालेल्या राज्य मार्गांच तत्काळ नूतनीकरण व्हावं यासाठी नगरपंचायत चे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी नगरसेवकांनी मंगळवारी  बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयावर धडक दिली. जोपर्यंत शहरातील राज्य मार्गांचे नूतनीकरणाचे काम शहरातून सुरू होत नाही, तोपर्यंत या कार्यालयातून हटणार नाही असा आक्रमक पवित्रा नगराध्यक्ष चेतन चव्हाण व नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष देविदास गवस बांधकाम संपत्ती नितीन मणेरीकर, नगरसेवक रामचंद्र मणेरिकर, नगरसेविका सुकन्या पनवेलकर, संजना माळवणकर, श्री. गवस यांसह माजी नगरसेवक सुधीर पनवेलकर आदींनी घेतला. यावेळी कार्यालयात उपविभागीय अधिकारी अनिल बडे उपस्थित नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. उपस्थित शाखा अभियंत्यांची चर्चा करत तत्काळ उपविभागीय अधिकाऱ्यांना येथे बोलावून घ्या व आमच्या मागणीची पूर्तता करा असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. दुपारी उशिरापर्यंत बांधकाम विभागाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी थेट राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. दोडामार्ग शहरवासीयांच्या भावना त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसमोर मांडल्या. रस्ता मंजूर असूनही नूतनीकरण होत नसल्यास बाबत चेतन चव्हाण यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले. त्याची तात्काळ दखल घेत मंत्री रवींद्र चव्हाण यांनी चेतन चव्हाण यांना संबंधित अधिकाऱ्यांना कॉन्फरन्स वर घेण्यास सांगितले, यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अनिल बडे कॉन्फरन्स वर येताच मंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यांची कान उघडनी केली. यावेळी अधिकारी यांनी ठेकेदार वेळेत काम करत नसल्याबाबत हतबलता बोलून दाखवली, त्यावर जे ठेकेदार ऐकत नाहीत निर्धारित वेळेत काम पूर्ण करत नाहीत, जनतेला वेठीस धरतात त्यांची गय करू नका, सांगून एकत नसतील त्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाका असे सक्त आदेश त्यांनी बांधकामच्या अधिकाऱ्यांना दिलेत. 

बुधवारपासून दोडामार्ग शहरातील मंजूर राज्यमार्ग रस्त्यांच्या नूतनीकरणास सुरुवात झाली पाहिजे आणि ८ दिवसात हे काम पूर्ण झालं पाहिजे अशा सक्त सूचना मंत्री महोदय यांनी दिल्या आहेत. आठ दिवसांत काम पूर्ण झाल्याचा अहवाल आपल्याकडे आला पाहिजे असेही  त्यांनी श्री. बडे यांना निर्देशित केलं आहे. दोडामार्ग नगरपंचायतच्या नगराध्यक्ष व सत्ताधारी नगरसेवकांनी येथील शहरवासीयांसाठी आणि खड्डे मुक्त शहरासाठी घेतलेला आक्रमक पवित्रा निश्चितच फलदायी ठरल्याचे बोलले जात आहे. दरम्यान शहरवासीयांच्या भावना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी लक्षात घेऊन कसे शहरातील दोन्ही राज्य मार्गांचा नूतनीकरण करण्याचे आदेश दिल्याने नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी शहरवासी यांचे वतीने रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले आहे.