रघुनाथ घोगळे यांना राज्य शासनाचा 'आदर्श शिक्षक पुरस्कार' जाहीर!

३ जानेवारीला मुंबईत होणार वितरण
Edited by: प्रा.रुपेश पाटील
Published on: December 31, 2022 20:03 PM
views 328  views

सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श राज्यशिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन शिक्षकांचा या पुरस्कारांमध्ये समावेश झाला असून माध्यमिक विभागाचा आदर्श शिक्षक पुरस्कार तळेबाजार (तालुका देवगड) येथील महात्मा गांधी विद्यामंदिरचे उपक्रमशील मुख्याध्यापक रघुनाथ अंकुश घोगळे यांना तर प्राथमिक विभागातून वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका स्नेहलता राणे यांना जाहीर झाला आहे. ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीदिनी मुंबई येथे या पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण होणार आहे.

 दरम्यान मुख्याध्यापक रघुनाथ घोगळे यांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. १९९५ साली प्र. के. अत्रे रात्र विद्यालय माहीम - मुंबई या प्रशालेतून अध्यापनाचे काम त्यांनी सुरू केले. तसेच नव हिंद ज्युनिअर कॉलेज शिंदेवाडी दादर या ठिकाणी १९९६ पासून अध्यापन सुरू केले. २००२ मध्ये महात्मा गांधी विद्यामंदिर, तळेबाजार ता. देवगड या प्रशालेत ते सहाय्यक शिक्षक म्हणून रुजू झाले.

गेली तब्बल वीस वर्षे या शाळेचा शंभर टक्के निकाल लावण्यासाठी व विद्यार्थी गुणवत्ता टिकविण्यासाठी ते अविरत परिश्रम करीत आहेत. केवळ शैक्षणिक क्षेत्रात नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण, क्रीडा अशा अनेक क्षेत्रांमध्ये श्री. घोगळे हे भरीव योगदान देत आहेत. नवोदय विद्यालय परीक्षा, विविध शिष्यवृत्ती परीक्षा, क्रीडा व इतर विषयांच्या विविध परीक्षा यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक  शेख, संस्थेचे अध्यक्ष संदीपशेठ तेली, खजिनदार संतोष वरेरकर तसेच सर्व संस्था संचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.