वैभववाडी ते करुळ घाटपायथ्यापर्यंत एसटी फेऱ्या सुरू करा

वाहतूक नियंत्रक यांना ग्रामस्थ - प्रवाशांचे निवेदन
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: January 24, 2024 11:42 AM
views 276  views

वैभववाडी :  रस्ता दुपदरीकरणाचे काम चालू असल्याने करूळ घाट वाहतुकीला पूर्णता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वैभववाडी ते करूळ घाट पायथा अशी एसटी सेवा सुरू करण्यात यावी. या मागणीचे निवेदन करूळ ग्रामस्थ व प्रवाशांच्या वतीने वैभववाडी वाहतूक नियंत्रक भागोजी गुरखे यांना देण्यात आले.

    यावेळी करूळ सरपंच नरेंद्र कोलते, तंटामुक्ती अध्यक्ष बबन सावंत, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र पवार, सामाजिक कार्यकर्ते अनंत कदम, ग्रामपंचायत सदस्य रेखा सरफरे, सदस्य माधवी राऊत, सौ पाटील, रवींद्र सरफरे, राजू कदम, दिलीप कदम, दीपक लाड, उदय सावंत, जगन्नाथ चव्हाण, जितेंद्र गुजर व ग्रामस्थ उपस्थित होते. 

    तरेळे - गगनबावडा या मार्गाचे काम सद्यस्थितीत युद्धपातळीवर चालू आहे. सुरक्षितेच्या दृष्टीने करूळ घाट मार्गावरील वाहतूक भुईबावडा व फोंडा घाट मार्गे वळविण्यात आली आहे. व करूळ घाट वाहतुकीला पूर्णतः बंद करण्यात आला आहे. एसटी फेऱ्या बंद झाल्याने करूळ गावातील प्रवाशांची खूपच गैरसोय होत आहे. वैभववाडीकडे शाळा, कॉलेज तसेच कामासाठी येणाऱ्या विद्यार्थी, प्रवाशी व नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे करूळ घाट पायथा पर्यंत सकाळी १० वा.,  दुपारी १२:३० वा. व संध्याकाळी ५ वाजता अशा तीन कायमस्वरूपी फेऱ्या घाट पूर्ववत होईपर्यंत सुरू ठेवाव्यात असे निवेदनात म्हटले आहे.