
वैभववाडी : वैभववाडी शहरातील स्टॉल हटविण्याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. परंतु या स्टॉलवरच अनेक कुटुंबांचा संसार सुरू आहे. त्यामुळे स्टॉल हटाव मोहीम पुन्हा राबवु नये अशी मागणी स्टॉलधारकांनी तहसिलदारांकडे केली आहे. तहसिलदार दिप्ती देसाई यांची स्टॉलधारकांनी भेट घेवुन निवेदन दिले.
शहरातील जुना कोकीसरे रस्त्यासह अन्य ठिकाणी असलेले स्टॉल विकासकामांकरिता फेब्रुवारी महिन्यात नगरपंचायतीने हटविले होते.त्यानंतर त्यांच जागेत पुन्हा स्टाॅल उभारण्यात आले आहेत.यावर नगरपंचायतीने दोन दिवसांपूर्वी तहसीलदार यांना निवेदन देऊन स्टॉलबाबत कारवाई करावी अशी मागणी केली होती.त्यानंतर पुन्हा स्टाॅल हटाव मोहिम राबविण्याच्या हालचालींना वेग आला आहे.यासंदर्भात आज स्टॉल धारकांनी तहसीलदार यांची भेट घेतली.स्टॉल हटाव मोहिम राबवू नये अशी मागणी केली.
यावेळी स्टॉलधारक राजप्पी रणजित पाटील,नगरसेविका अक्षता जैतापकर,नगरसेवक मनोज सावंत,शिवाजी राणे,सुरेश कर्पे,अंजली शिवगण,यांच्यासह अनेक स्टॉलधारक उपस्थित होते.