एसटी - दुचाकीचा अपघात ; दुचाकीस्वार गंभीर

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 22, 2025 18:37 PM
views 594  views

देवगड : एसटी व दुचाकी यांच्यातील झालेल्या समोरासमोरील अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. फोंडा येथील दुचाकी स्वार विलास भांबू खरात (३२) या युवकाच्या तोंडास व नाकास गंभीर दुखापत झाल्याची घटना सोमवारी सकाळी १२.३० सुमारास हडपीड पुलानजीक घडली.हा एसटी व दुचाकी यांच्यातील समोरासमोरील अपघातात घडला.

या अपघाताच्या संदर्भात एसटी चालक सुहास सूर्यकांत माईणकर वय (४७) राहणार कणकवली यांनी देवगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानुसार मोटर अपघाताची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी देवगड पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव ,सहा. पोलीस उपनिरीक्षक राजन जाधव, फकरुद्दीन आगा, पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र महाडिक यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली व पंचनामा करून या अपघातातील दुचाकी चालक विरुद्ध मोटार वाहन अधिनियम १९८९ चे कलम १८४बीएन्एस १२५(A) १२५( B) २८१,३२४,(४) ३२५(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र महाडिक करीत आहेत.

ही घटना २१ एप्रिल रोजी सकाळी १२.३० सुमारास घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवगड आगाराची देवगड पणजी (एमएच बी-२०बी एल २९११) ही प्रवासी फेरी ही देवगड येथून नांदगावच्या दिशेने जात असताना नांदगाव हुन देवगडच्या दिशेने येणारा दुचाकी स्वार विलास भांबू खरात हे आपल्या ताब्यातील पॅशन प्रो दुचाकी (एम एच ०७ ए सी २२२४) भरधाव वेगाने घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या एसटीला धडक बसली. या अपघातात त्यांच्या नाकास तोंडास गंभीर दुखापत झाली. या घटनास्थळी गंभीर दुखापत झालेल्या दुचाकी स्वारास पुढील उपचारासाठी दुचाकी स्वारास कणकवली येथे हलविण्यात आले.