सरकारच्या नाकर्तेपणामुळे ST कर्मचारी बोनस पासून वंचित : अनुप नाईक

Edited by:
Published on: November 01, 2024 17:36 PM
views 184  views

कुडाळ  : शिवसेना नेते आणि माजी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या कार्यकाळात एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सुरू झालेला दिवाळी बोनस यावर्षी मात्र एस.टी. कर्मचाऱ्यांना सरकारच्या नाकर्तेपणामुळे अजून मिळाला नसल्याने कर्मचाऱ्यांना हक्काच्या बोनस पासून वंचित राहावे लागत आहे. शिवसेना सरकारच्या काळात एस.टी. कामागरांप्रति आदर दाखवत अनेक चांगले निर्णय घेतले गेले याची जाणीव आजही प्रत्येक कर्मचाऱ्याला आहे.तरीही कर्मचाऱ्यांना भडकवून उद्धवसाहेब ठाकरे यांचे सरकार पाडण्याचे कुटील कारस्थान गुणरत्न सदावर्ते ला हाताशी धरून आताच्या महायुती च्या नेत्यांनी केले.याची जाहीर कबुलीही सदावर्ते यांनी एका  कार्यक्रमात दिली.

शिवसेना काळात एस.टी. कामगारांना ताठ मानेने जगता येईल असे अनेक निर्णय घेतले गेले पण याची धास्ती घेतलेल्या महायुतीच्या नेत्यांनी मात्र याच प्रामाणिक कर्मचाऱ्यांना भुलवून त्यांच्या भावनेचा बाजार मांडला आणि आपला स्वार्थ साधुन घेतला.पण याच महायुतीतील नेते असणारे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी मात्र सरकार सत्तेत आल्यावर सरकारकडून प्रामाणिकपणे एस.टी. कामगारांना काहीतरी मिळावं यासाठी प्रयत्न देखील केल्याचे केव्हा दिसुन आले नाही.

आताही या वर्षी दिवाळी साठी कर्मचाऱ्याना बोनस स्वरूपात मिळणारी रक्कम  आणि सण उचल दिवाळी सुरू झाली तरीही कर्मचाऱ्यांना मिळालेली नसल्याने एस.टी. कामगारांना त्यावेळी भाजपा नेत्यांनी दाखवलेल प्रेम ही फसवणूक असल्याची ठाम जाणीव झाली आहे.महायुतीत असणाऱ्या पक्षाच्या ज्या एस.टी. कामगार संघटनां आहेत त्यांनीही आपल्या नेत्यांमार्फत हा व्यथा सरकारपर्यंत पोचवून कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्काचा बोनस आणि सण उचल मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत अन्यथा सत्तेत असूनही या संघटना कर्मचाऱ्यांना अजूनही बोनस मिळाला नाही तो मिळण्यासाठी प्रयत्न करत नसतील तर  उपयोग काय ? असा सवाल कर्मचारी विचारत आहेत.जर अजूनही हे महायुती सरकार एस.टी. कामगारांना गृहीत धरून चालत असेल तर मात्र महायुतीला एस.टी. कर्मचारी नक्कीच जागा दाखवतील आणि महायुतीच्या विरोधी मतदान करतील असा विश्वास एस.टी. कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप नाईक यांनी व्यक्त केला आहे.