SSPMत इंजिनिअरिंग ॲडमिशन काउंसिलिंग सेंटर

अभियांत्रिकी प्रवेशासंबंधी अचूक मार्गदर्शन मिळणार
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: May 29, 2025 20:18 PM
views 93  views

कुडाळ : एसएसपीएम महाविद्यालयात अभियांत्रिकी इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025-26 साठीचे कौन्सिलिंग सेंटर सुरू करण्यात आले असून प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर यांच्या हस्ते ॲडमिशन काउंसिलिंग सेंटरचे उदघाटन करण्यात आले. अभियांत्रिकी प्रवेशासंबंधी अचूक मार्गदर्शन तसेच शासनाचे मान्यताप्राप्त DTE फॅसिलिटेशन सेंटर आणि  विद्यार्थ्यांचं CET रिझल्ट लागल्यानंतर रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ची विनामूल्य सेवा या काउंसिलिंग सेंटरमुळे मिळणार आहे.

योग्य वेळी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधःकारमय होण्याची शक्यता असते, या गोष्टीचा विचार करून ग्रामीण भागातील पालकांची व विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी कोणतीही द्विधा स्थिती होऊ नये आणि पालक व विद्यार्थ्यांना प्रवेशासंदर्भात योग्य दिशा आणि अचूक माहिती मिळावी यासाठी या मार्गदर्शन कक्षाची स्थापना केली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष (पदवी) अभियांत्रिकी कोर्सेसच्या प्रवेशासंदर्भातील सर्व माहिती एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने ही वाटचाल केली आहे. 

या महाविद्यालयामध्ये संगणक अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, मेकॅनिकल अभियांत्रिकी, मेकाट्रॉनिक्स अभियांत्रिकी, संगणक शास्त्र, कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक शास्त्र अभियांत्रिकी शाखांमध्ये पदवी अभ्यासक्रमांची सुविधा उपलब्ध आहेत. 

बारावी उत्तीर्ण झालेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खासदार नारायण राणे यांनी १९९९ साली अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. विद्यार्थ्यांची चांगल्या कंपनीत अथवा प्रशासकीय क्षेत्रात कशी निवड होईल व उत्तम करिअर कसं घडेल या दृष्टीने सातत्याने प्रयत्न अभियांत्रिकी महाविद्यालय, कणकवलीमध्ये होत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांना अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी तसेच शैक्षणिक शुल्क, शासनाच्या विविध स्कॉलरशीप्स, विद्यार्थ्यांसाठी असणारी वसतिगृह सुविधा, कमवा व शिका योजना आदींबाबत चर्चा व मार्गदर्शन होण्यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. विद्यार्थी व पालकांना अचूक माहिती मिळावी व कोणत्याही विभागातून उत्तम करिअर करता यावे यासाठी या मार्गदर्शन केंद्रात उच्चशिक्षित प्राध्यापक वर्गाची टीम सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सज्ज असणार आहे.

प्रवेश प्रक्रियेसंदर्भात काही अडचणी असल्यास अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रा. सचिन मेस्त्री (७५८८५०५२८५), प्रा. इम्रान पटेल (९७३०८०२०४६) व द्वितीय वर्ष प्रवेशासाठी प्रा. वैभव माईणकर (९०४९८१३८७०), प्रा. अजित गोसावी (९४२०८२२४१५) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर यांनी केले आहे.