
वेंगुर्ला : तालुक्यातील मातोंड येथील स्वयंभू व जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देवी सातेरी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या रविवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. ही जत्रा लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे. श्री देवी सातेरीचा जत्रोत्सव कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला होतो. जत्रोत्सवा दिवशी सकाळपासून ओट्या भरणे, नवस फेडणे, आदी कार्यक्रम होतात. रात्री ८ वाजता सवाद्य तरंग देवतांसहित देवीच्या उत्सव मूर्तीचे मंदिरात आगमन झाल्यानंतर रात्री ११ वाजता निर्जळी उपवास असलेले भाविक मंदिराभोवती लोटांगण घालून आपला नवस फेडतात. लोटांगण पाठोपाठ पालखी सोहळा संपन्न होतो. यानंतर रात्री १ वाजता गावातील दशावतारी नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर होतो. या जत्रोत्सवानिमित्त मंदिराभोवतालची आकर्षक विद्युत रोषणायी करण्यात आली आहे. जत्रेसाठी मुंबई, गोवा व कर्नाटक भागातून भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात.