
कुडाळ : गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक ऐक्य, पर्यावरण संवर्धन आणि लोकजागृती यांचेही उत्तम माध्यम ठरू शकतो, याचे प्रत्यंतर रोटरी क्लब ऑफ कुडाळने दिले. दिनांक 26 ऑगस्ट रोजी क्लबच्या वतीने कुडाळ बाजारपेठेत तसेच कुडाळ बसस्थानक परिसरात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना 200 कापडी पिशव्यांचे वाटप करून ‘प्लास्टिकमुक्त पर्यावरणपूरक जीवनशैली’ चा संदेश देण्यात आला. गणेश चतुर्थीच्या येत्या चार दिवसात रोटरी क्लब कुडाळ कडून एकंदरीत 1000 कापडी पिशव्यांचे वाटप होणार आहे
पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे महत्त्व - आजच्या घडीला प्लास्टिकमुळे होणारे पर्यावरणीय प्रदूषण ही गंभीर समस्या ठरत आहे. बाजारपेठा, बसस्थानके व इतर सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्या वापरल्या जातात. त्याचा थेट परिणाम जमिनीच्या सुपीकतेवर, पाण्याच्या प्रवाहावर व पशुपक्ष्यांच्या आरोग्यावर होत असतो. या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ कुडाळने नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक पर्यायांची जाणीव निर्माण करण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबवला. कापडी पिशवी ही टिकाऊ, पुनर्वापरता येणारी व पर्यावरणासाठी सुरक्षित अशी असल्याने नागरिकांनी याला उत्तम प्रतिसाद दिला.
उपक्रमाला संस्थांचे सहकार्य- या पिशव्या तयार करण्यासाठी आकार फाउंडेशन, सोमदत्त प्लास्टिक, हॉटेल स्पाइस कोकण, क्रांती सिरॅमिक्स या स्थानिक संस्था व व्यावसायिकांनी मोलाचे सहकार्य केले. समाजहिताच्या कामासाठी विविध क्षेत्रांतील संस्थांनी पुढाकार घेतल्यामुळे उपक्रम अधिक प्रभावी ठरला.
मान्यवरांची उपस्थिती- कार्यक्रमाच्या वेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे अध्यक्ष रो. राजीव पवार,क्रेडाई सिंधुदुर्गचे अध्यक्ष रो. गजानन कांदळगावकर, रो. ऍड. राजीव बिले,सचिव रो. मकरंद नाईक, खजिनदार रो. राकेश म्हाडदळकर, , रो. नीता गोवेकर, रो. रवींद्र परब, रो. आनंद वेंगुर्लेकर, रो. शशिकांत चव्हाण, डॉ. शिल्पा पवार, रो. डॉ. योगेश नवांगुळ यांच्यासह अनेक रोटरी सदस्य उपस्थित होते. बाजारपेठेतील व्यापारी, ग्राहक तसेच बसस्थानक परिसरातील नागरिकांनीही कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - पिशव्यांचे वाटप होताच अनेक नागरिकांनी रोटरी क्लबचे आभार मानले. “दरवर्षी गणेशोत्सवात खरेदी करताना प्लास्टिकची पिशवी टाळणे कठीण जाते, पण आज क्लबने दिलेल्या कापडी पिशवीमुळे यावर्षीचा सण खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक होणार आहे”:अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली.
रोटरी क्लब ऑफ कुडाळ गेल्या अनेक वर्षांपासून समाजोपयोगी उपक्रमांत अग्रेसर आहे. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, उद्योजकता प्रोत्साहन आदी विविध क्षेत्रांमध्ये क्लबने महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. आगामी काळात देखील सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरणपूरक उपक्रम राबवले जातील, असे आश्वासन अध्यक्ष रो. राजीव पवार यांनी यावेळी दिले.