
वेंगुर्ले : खेळामध्ये आपण एक टीम म्हणून आणि एक संघ म्हणून विजयाच्या दिशेने पुढे जातो तसेच उद्यापासून कामावर जाताना आपणही त्याच जोमाने आणि ताकतीने काम करण हे काळाची गरज आहे. तुमच्या कामामधील ताणतणाव दूर व्हावा व नव्या जोमाने कामे व्हावीत यासाठी अशा पद्धतीचे क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव शासनाने आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. निश्चित पद्धतीने आपण उद्यापासून जेव्हा आपल्या कामावर जाल तर त्याचा एक चांगला सकारात्मक परिणाम प्रशासनावर होईल असा विश्वास मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त वेंगुर्ले येथे बोलताना व्यक्त केला.
आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई व जिल्हा सहआयुक्त नगर विकास शाखा, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय नगरपरिषद - नगरपंचायत वार्षिक क्रिडा सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप वेंगुर्ले कॅम्प येथे नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करून करण्यात आला. मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व राज्य गीताने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी अनिल पाटील, नगरविकास विभाग सिंधुदुर्ग शाखेचे जिल्हा सह आयुक्त विनायक औंधकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, वेंगुर्ला तहसीलदार तथा राष्ट्रीय खेळाडू ओंकार ओतारी, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे (मालवण), अरविंद नातू (कुडाळ), सागर साळुंखे (सावंतवाडी), सुरज कांबळे (देवगड -जामसंडे), प्रतीक थोरात (वाभेवे-वैभववाडी), गौरी पाटील (कणकवली), संकेत गायकवाड (कसई - दोडामार्ग), पोलीस निरीक्षक संदीप भोसले आदी उपस्थित होते.
यावेळी व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम मालवण नगरपरिषद संघ, कबड्डी स्पर्धेत प्रथम कणकवली नगरपंचायत संघ, रीले स्पर्धेत महिला गटात प्रथम कुडाळ नगरपंचायत संघ, पुरुष गटात प्रथम सावंतवाडी नगरपरिषद संघ, रस्सीखेच स्पर्धेत महिला गटात प्रथम कणकवली नगरपंचायत संघ व पुरुष गटात वेंगुर्ला नगरपरिषद संघ यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अनिल पाटील म्हणाले की, जिंकण व हरण महत्वाच नाही एकत्र येणं महत्त्वाचं आहे. आपण सर्वांनी या महोत्सवात जसे एक संघपणे सहभागी झालात तसेच प्रत्येक ठिकाणी काम करताना मन लाऊन काम करा. वाईट काम करू नका असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पठाण यांनी प्रास्ताविक मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी तर उपस्थित मान्यवरांचे आभार व क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव यशस्वी केल्याबद्दल सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार वेंगुर्ला मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी मानले.