
सावंतवाडी : मुंबई विद्यापीठाचा ५७ वा सिंधुदुर्ग जिल्हा विभागीय युवा महोत्सव यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. निलेश सावे, सिंधुदुर्ग विभाग सांस्कृतिक समन्वयक डॉ. आशिष नाईक, सहसमन्वयक डॉ. नितीन वळंजू, भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, प्राचार्य डॉ. विजय जगताप, आयोजन समिती समन्वयक गायत्री आठलेकर व सहसमन्वयक संयुजा निकम आदी उपस्थित होते. महोत्सवात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ३५ महाविद्यालये व त्यामधील साडेपाचशे स्पर्धक सहभागी झाले होते.
यावेळी ललित कला, संगीत, नृत्य, गायन आणि साहित्य अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये विभागीय फेरीतून निवड झालेल्या प्रथम तीन व उत्तेजनार्थ विजेत्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या अंतिम फेरीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. दिवसभर चाललेल्या स्पर्षेचे परीक्षक म्हणून प्रत्येक प्रकारातील तज्ञ व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते. स्पर्धा ही निकोप आणि खेळीमेळीच्या वातावरणात व्हावी व त्याचा आनंद सर्वांनी घ्यावा असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले यांनी उदघाटनप्रसंगी केले. सिंधुदुर्ग जिल्हा हा कलावंत घडवणारा तसेच शिस्त व माणुसकी जपणारा आहे. विद्यार्थांनी आपल्या कलेसोबत नैतिक मुल्यांचेही सादरीकरण करावे असे आवाहन प्राचार्य डॉ. विजय जगताप यांनी केले. बक्षीस वितरण प्रसंगी डॉ. निलेश सावे यांनी शिस्तबद्ध व उत्तम आयोजन केल्याबद्दल संस्थेचे पदाधिकारी व सर्व फार्मसी टीमचे कौतुक केले.