
चिपळूण : गांधारेश्वर येथील महात्मा गांधीजींच्या समाधीला 77 वर्ष पूर्ण झाल्याने पूज्य गांधी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कै.तात्यासाहेब कोवळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पूज्य गांधी प्रतिष्ठान तर्फे विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. गांधीजींच्या रक्षाकळस समाधी समोर निसर्गरम्य परिसरात सदर स्पर्धा प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटात घेण्यात आल्या. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शिवाय मुलांचे कौतुक करण्यासाठी शिक्षक तसेच पालक आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सचिव सुनील खेडेकर यांनी प्रास्ताविकामध्ये कै. तात्या कोवळे यांनी गांधी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष म्हणून केलेल्या कामाबद्दल तसेच सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच गांधी प्रतिष्ठानच्या वर्षभरातील कार्याचा आढावा घेतला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोवळे कुटुंबीयांपैकी तात्यांचे भाऊ निवृत्त पोलीस उपसंचालक कुमार कोवळे, चंद्रकांत कोवळे ,तात्यांचे नातू व सामाजिक कार्यकर्ते निहार कोवळे व समीर कोवळे उपस्थित होते. त्याचप्रमाणे सूचयअण्णा रेडीज, बापू काणे,सुरेश तांबट,अमित पिसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी निहार कोवळे यांनी आपल्या भाषणात गांधी प्रतिष्ठानला भविष्यकाळात अनेक उपक्रम राबविण्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच कुमार कोवळे व बुकलॅडच्या संचालिका सुनिता महाडिक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
गांधारेश्वरच्या निसर्गरम्य परिसरात पार पडलेल्या या स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या जीवनावर आधारित विषयांवर अप्रतिम अशी चित्रे रेखाटली.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-- प्राथमिक गट, प्रथम क्रमांक कु. अनन्या गणेश भोबेकर (एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूल),द्वितीय क्रमांक आर्या परेश पाटील (न्यू इंग्लिश स्कूल सती), तृतीय क्रमांक अनुष्का संदीप घाग (गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालय सावर्डे) उत्तेजनार्थ, आरोही प्रदीप कांबळे (परांजपे मोतीवले हायस्कूल), सिद्धी सुनील ठाकूर (क्रिस्त ज्योती हायस्कूल), झोया खोत (अली पब्लिक स्कूल) माध्यमिक गट, प्रथम क्रमांक तनिष्का संजय काणेकर (न्यू इंग्लिश स्कूल सती चिंचघरी), द्वितीय क्रमांक सुजल रघुनाथ तोडकर (गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालय सावर्डे ),तृतीय क्रमांक आयुष पराग दहिवलकर (न्यू इंग्लिश स्कूल पाग) उत्तेजनार्थ, दुर्वा अविनाश शिंदे (मेरी माता स्कूल), केतन मारुती जाधव (न्यू इंग्लिश स्कूल सती चिंचघरी).
परीक्षक म्हणून कुंभार एस.ए. व पाटील टी. एस. यांनी काम पाहिले. विजेत्यांना रोख पारितोषिक व वस्तू देऊन गौरविण्यात आले, तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना पुस्तके व प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सई वरवाटकर यांनी केले तर लियाकत शहा यांनी आभार मानले . कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. विनायक होमकळस, जाफर गोठे, दीपक महाडिक, मंगेश वेस्वीकर, प्रशांत व छाया सातारकर, अमृता होमकळस यांनी प्रयत्न केले.