
सावंतवाडी : मुक्ताई ॲकेडमी सावंतवाडी आणि व्हिजन, मुंबई यांच्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या "आवाज व अभिनय" कार्यशाळेला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, मालवण, कणकवली येथील पहीली ते दहावीतील तब्बल अठ्ठेचाळीस मुला-मुलींनी कार्यशाळेत सहभाग घेतला.या चार दिवशीय कार्यशाळेचे आयोजन सावंतवाडी येथील श्री.पंचम खेमराज महाविदयालयाच्या सभागृहात करण्यात आले.
कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, जिल्हा व्यापारी महासंघाचे नितीन वाळके, पहिली मालवणी बालकादंबरी "कारटोच्या" लेखिका, बालकविता व बालकथा लेखिका, कवयित्री आणि विविध पुरस्कारप्राप्त साहित्यिका कल्पना मलये, जयप्रकाश सावंत, सतीश पाटणकर, कार्यशाळेचे मार्गदर्शक श्रीनिवास नार्वेकर आणि स्वरुपा सामंत, मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर, उपाध्यक्षा स्नेहा पेडणेकर, बाळकृष्ण पेडणेकर उपस्थित होते.
राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांनी कौस्तुभ पेडणेकर मुलांसाठी करत असलेल्या नवीन उपक्रमाचे कौतुक करतानाच, भविष्यात मुलांना विविध क्षेत्रात याचा लाभ होईल, असे म्हटले. नितीन वाळके यांनी या मुलांमधून मोठे कलाकार तयार होतील आणि त्यासाठी मुलांनी सातत्य राखण्याचे आवाहन केले. कल्पना मलये मार्गदर्शन करताना म्हणाल्या की आज मुलांसाठी मोठ्या प्रमाणात बालसाहित्य उपलब्ध आहे. मुलांनी नियमित वाचन करण्याचे त्यांनी आवाहन केले.सतीश पाटणकर यांनी मुक्ताई ॲकेडमीने सावंतवाडीत मुलांसाठी सुरु केलेल्या या चळवळीचे कौतुक केले. कार्यशाळेचे मार्गदर्शक श्रीनिवास नार्वेकर यांनी चार दिवस मुलांनी कार्यशाळेत घेतलेल्या प्रशिक्षणाविषयी माहिती दिली.
मार्गदर्शिका सौ.स्वरुपा सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी मुलांनी स्वत: लेखन, दिग्दर्शन केलेल्या नाट्यछटा सादर केल्या.उपस्थितांनी मुलांचे कौतुक केले. यावेळी "भेरा" चित्रपटाचे श्रीकांत प्रभाकर, दिपक जोईल, प्रमोद कोयंडे यांनी कार्यशाळेला सदिच्छा भेट दिली. मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांनी मुलांसाठी यापुढे बालनाट्य, वादयवृंद, इत्यादी उपक्रम घेण्यात येतील असे जाहीर केले. आभार प्रदर्शन स्नेहा पेडणेकर यांनी केले.