LIVE UPDATES

मार्कंडीमध्ये मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवाजी महाराज ट्रस्ट व डेरवण ट्रस्ट हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
Edited by: मनोज पवार
Published on: July 09, 2025 18:53 PM
views 39  views

चिपळूण : श्री छत्रपती शिवाजी महाराज ट्रस्ट, मार्कंडी आणि वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटल, डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. स्थानिक नागरिकांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले असून विविध आजारांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी व औषधवाटप करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन माजी आमदार रमेशभाई कदम यांच्या हस्ते पार पडले. यावेळी चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती दीपमाला नाटुस्कर, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सौ. स्नेहल चव्हाण, शासनमान्य जलयोद्धा  शाहनवाज शाह, उपशहराध्यक्षा सौ. राणी महाडीक, पर्यावरणप्रेमी समीर कोवळे तसेच शिवाजी महाराज ट्रस्टच्या कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, हाडांच्या समस्यांबाबत तपासणी, स्त्रीरोग सल्ला, त्वचाविकार आणि डोळ्यांची तपासणी यांसह अनेक वैद्यकीय सेवा पुरविण्यात आल्या. अनुभवी डॉक्टरांनी तपासणी करून गरजूंना तात्काळ औषधोपचार दिले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवाजी महाराज ट्रस्टचे सर्व सदस्य व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. शिबिराला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भविष्यातही अशा आरोग्यवर्धक उपक्रमांचे आयोजन करावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.