कट्टा इथं जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

शिक्षक भारती सिंधुदुर्ग व बॅ नाथ पै सेवांगणचा पुढाकार
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: January 29, 2024 09:19 AM
views 198  views

सिंधुदुर्ग : शिक्षक भारती सिंधुदुर्ग व बॅ नाथ पै सेवांगण शाखा कट्टाच्यावतीने जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेण्यात आली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 38 केंद्रावर इ ५ वी व इयत्ता ८ वी साठी शिष्यवृत्ती सराव परीक्षा संपन्न झाली.  या सराव परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३५० विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. 


वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी उद्घाटन केले. या सराव परीक्षेमुळे विद्यार्थी अधिक आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जातील असा विश्वास व्यक्त करून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. वराडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय नाईक यांनी सराव परीक्षेचा हा उपक्रम गेली १५ वर्ष सातत्याने सुरू असून यामध्ये मला सहभागी होता आले याचा आनंद व्यक्त करून संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.

प्रसाद परुळेकर यांनी सराव परीक्षेचे महत्व विषद केले. यावेळी अजयराज वराडकर, संजय नाईक, बापू वराडकर, प्रसाद परुळेकर, दीपक भोगटे, महेश भाट, प्रकाश कानूरकर, वाजंत्री सर, गावडे सर, सरनाईक गुरुजी, बाळकृष्ण गोंधळी, अर्जून पेंडूरकर, मनोज काळसेकर उपस्थित होते.

या परीक्षेचे नियोजन शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर व त्यांचे सर्व पदाधिकारी व सहकारी शिक्षक, शिक्षक भारतीचे सर्व तालुक्यांचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच  बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेचे सर्व पदाधिकारी यांनी केले. या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल व गुणवंतांचा सत्कार समारंभही घेण्यात येईल असे आयोजकांच्यावतीने जाहीर करण्यात आले.