
वेंगुर्ला : वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत ‘’घरोघरी तिरंगा’’ हे अभियान साजरे करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत नाटककार मधुसुदन कालेलकर सभागृह या ठिकाणी दिनांक १४ ऑगस्ट रोजी देशभक्तीपर समूह गीत व नृत्य सादरीकरणाचा सांस्कृतिक कार्यक्रम मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यकमाचे उद्घाटन व दीपप्रज्वलन बॅ. खर्डेकर महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. एम.बी.चौगुले, प्राध्यापिका डॉ. धनश्री पाटील, परिविक्षाधिन मुख्याधिकारी श्री. थोरात, कैवल्य पवार, प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, सत्यवान साटेलकर व महेंद्र मातोंडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात तिरंगा शपथ घेवून करण्यात आली. यानंतर वेंगुर्ला शहरातील वेंगुर्ला हायस्कूल, सिंधुदुर्ग विदयानिकेतन, शिवाजी प्रागतिक शाळा, वेंगुर्ला तालुका स्कूल नं. १,२ व ४ या शाळांच्या विदयार्थ्यांनी देशभक्तीपर समूह गीत व नृत्य सादर केले.
तदनंतर भारतीय स्वातंत्र्य लढयात महत्वाची भूमिका बजावणा-या महानायकांची वेशभूषा या विषयावर आधारित वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा दोन गटांमध्ये पार पडली. इयत्ता पहिली ते चौथी या पहिल्या गटामध्ये वेंगुर्ला शहरातील विविध शाळांमधून एकूण ३२ स्पर्धक सहभागी झाले होते. इयत्ता पाचवी ते दहावी या गटामध्ये एकूण ५ स्पर्धक सहभागी झाले होते. या वेशभूषा स्पर्धेच्या परिक्षणाचे काम प्राध्यापिका डॉ. धनश्री पाटील व कैवल्य पवार यांनी केले. यावेळी वेंगुर्ला शहरातील विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.