
सिंधुदुर्ग: महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या कर्करोग निदान शिबिरांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कर्करोग निदान व्हॅनद्वारे जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर संशयित रुग्णांची तपासणी केली जात आहे.
कुडाळ तालुक्यात शिबिराचे आयोजन -
या मोहिमेअंतर्गत, २ ऑगस्ट २०२५ रोजी कुडाळ तालुक्यातील नागरिकांसाठी जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन रानबांबुळीच्या सरपंच परशुराम परब आणि ओरोस बुद्रुकचे उपसरपंच पांडुरंग मालवणकर यांच्या हस्ते झाले. या व्हॅनमध्ये महिलांसाठी मुख, गर्भाशय आणि स्तन कर्करोग तसेच पुरुषांसाठी मुख कर्करोगाची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली.
या शिबिरात एकूण १७० महिला आणि ३५ पुरुष अशा एकूण २०५ लोकांची तपासणी करण्यात आली. दिवसेंदिवस महिलांमध्ये वाढत असलेल्या कर्करोगाचे प्रमाण लक्षात घेऊन, शासनाने अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचून वेळीच निदान आणि उपचार करण्याचा निर्धार केला आहे.
पुढील शिबिरांचे वेळापत्रक -
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कर्करोग निदान व्हॅन ४ ऑगस्ट २०२५ रोजी उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे जाणार आहे. कणकवली तालुक्यात ४ ते ७ ऑगस्ट या कालावधीत, तर ८ आणि ९ ऑगस्ट रोजी वैभववाडी तालुक्यातील विविध आरोग्य संस्थांमध्ये तपासणी शिबिरे होणार आहेत.
ज्या नागरिकांना कर्करोगाची लक्षणे जाणवत असतील, त्यांनी जवळच्या आरोग्य संस्थेत तपासणी करून घेण्याचे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे. या शिबिरांच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि स्थानिक आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यात डॉ. श्रीपाद पाटील,डॉ. अनंत दवंगे, डॉ. श्याम पाटील, डॉ. सुबोध इंगळे, डॉ. वर्षा शिरोडकर, डॉ. शिल्पा नारायणकर,श्री अनिलकुमार देसाई, श्री केतन कदम, श्री रमेश पंडित, श्री संतोष खानविलकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.