
सावंतवाडी : स्वराज्य रक्षक युवक मंडळ शिवाजी स्मारक आणि ऑन काॅल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्सव व छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती प्रतिष्ठापना याचे औचित्य साधून कलंबिस्त येथे रक्तदान शिबीर आयोजित केले होते.
यावेळी एकूण एकवीस रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग घेतला व सतरा रक्तदात्यांनी रक्तदान केले. उर्वरीत चार रक्तदाते काही तांत्रिक कारणास्तव रक्तदान करु शकले नाहीत. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन व शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर सरपंच सौ. सपना सावंत, उपसरपंच सुरेश पास्ते, माजी सरपंच अनंत सावंत, माजी पंचायत समिती सदस्य रमेश सावंत, पोलिस पाटील सौ. प्रियांका सावंत, उद्योजक जयु गवस, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष सूर्यकांत राजगे, ऑन काॅल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग चे कार्याध्यक्ष महेश रेमुळकर, सचिव बाबली गवंडे, खजिनदार सिद्धार्थ पराडकर, रक्तसंक्रमण अधिकारी डाॅ. विनायक पारवे आदि उपस्थित होते.
ऑन काॅल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्गचे सचिव बाबली गवंडे म्हणाले की, आमची संस्था ही गावोगावची स्थानिक मंडळे व संस्थांच्या सहकार्याने रक्तदान शिबिरे घेऊन रक्तदानाची चळवळ गावागावात पोहोचविण्यासाठी कार्यरत आहे. आणि आज आपण आपल्या स्वराज्य रक्षक युवक मंडळामार्फत शिवजयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबीर आयोजित केले, तसेच या रक्तदान शिबिरासाठी आपणांसोबत आमच्या संस्थेला सहभागी करुन घेतलेत, त्याबद्दल मंडळाचे आभार मानले. छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी रक्त सांडले व रयतेचे रक्षण करण्याचे महान कार्य केले, तद्वत आज शिवजयंतीचे औचित्य साधून आपल्या मंडळाच्या शिलेदारानी रक्तदान करुन तीन-तीन जणांचे प्राण वाचविण्याचे पूण्यकर्म केले आहे. भविष्यात कधी कोणाला रक्ताची गरज लागली तर कधीही संपर्क करा, ऑन काॅल रक्तदाते संस्थेमार्फत ती शक्य तेवढ्या लवकरात लवकर पूर्ण केली जाईल याची ग्वाही दिली. गावच्या पोलिस पाटील सौ. प्रियांका सावंत यांनी मंडळाने आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरासाठी शुभेच्छा देतानाच ऑन काॅल रक्तदाते संस्थेचे कार्य मी अगदी जवळून अनुभवले आहे की, कोणालाही रक्ताची तातडीची गरज भासली तर या संस्थेचे रक्तदाते केवळ एका काॅलवर ताबडतोब, धावतपळत जाऊन रक्तदान करतात व रुग्णाचा बहुमूल्य जीव वाचवितात, हे या संस्थेचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे असे मत व्यक्त करतानाच आपण आम्हाला हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले, त्याबद्दल संस्थेला धन्यवाद दिले.
यावेळी सुमित राऊळ, आत्माराम राऊळ, शैलेश सावंत, रामचंद्र सावंत, दिपक सावंत, रविकमल सावंत, शरद सावंत, संतोष सावंत, कमलाकर सावंत, करण सावंत, चेतन सावंत, सुनिल तावडे, शरद सुकी, मंदार जंगम, नेल्सन राॅड्रीग्ज या रक्तदात्यांसहीत अमरनाथ धुरी (साळगाव), नितिन सावंत (केसरी) तसेच निखिल लिंगवत (वेर्ले) मिळून एकूण सतरा रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी स्वराज्य रक्षक युवक मंडळाचे दिपक सावंत, रविकमल सावंत, प्रल्हाद तावडे, विश्वजित सावंत, रामचंद्र सावंत, रविंद्र तावडे, आनंद सावंत, माजी सैनिक संतोष सावंत, महेश सावंत, राधिका सावंत, शैलजा सावंत, आनंदी सावंत, तसेच सावंतवाडी रक्तपेढीचे अनिल खाडे, प्राजक्ता रेडकर, मानसी बागेवाडी तसेच कलंबिस्त ग्रामस्थ उपस्थित होते. एकूणच रंगतदार झालेल्या या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रल्हाद तावडे यांनी केले. प्रास्ताविक रविकमल सावंत यांनी केले तर आभार महेश रेमुळकर यांनी मानले.