
सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीच्यावतीने सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या भव्य दहीहंडी उत्सवाला सावंतवाडीकरांनी मोठा प्रतिसाद दिला. युवा नेते संदीप एकनाथ गावडे यांच्या संकल्पनेतून राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मैदानावर हा सोहळा पार पडला. या उत्सवाचे प्रमुख आकर्षण 'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि पालकमंत्री नितेश राणे यांची विशेष उपस्थिती ठरली. या वर्षीच्या दहीहंडी स्पर्धेत जय हनुमान गोविंदा पथक, खडपेवाडी (राजापूर) यांनी प्रथम क्रमांक पटकावत १ लाख ११ हजार १११ चे रोख पारितोषिक जिंकले.
दरम्यान, स्थानिक गोविंदा पथक महापुरुष भटवाडी यांना दहीहंडी फोडण्याचा मान देण्यात आला. यासोबतच, अमेय तेंडोलकर मित्रमंडळ (सावंतवाडी), श्री रुद्र (परूळे), शिवगर्जना (बांदा), आडिवरे (राजापूर), वरचीवाडी (राजापूर) या संघांना प्रत्येकी ₹ ११,१११ चे उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. यावेळी उपस्थित अभिनेत्री रिंकू राजगुरूने 'मराठीत सांगलेला कळत नाय, मालवणीत सांगू?' हा डायलॉग मालवणी भाषेत म्हणून उपस्थितांची मने जिंकली. तसेच, पालकमंत्री नितेश राणे यांनी सावंतवाडीकरांच्या उत्साहाचे कौतुक केले. ते म्हणाले की, रात्री उशिरापर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने लोक मुंबई आणि ठाण्याबाहेर पहिल्यांदाच पाहिले. सावंतवाडीकरांनी मला थक्क केले, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. या सोहळ्यात ढोलपथक, ऑर्केस्ट्रा आणि डीजेच्या तालावर सांस्कृतिक दहीहंडीचा थरार अनुभवायला मिळाला. यावेळी भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, भाजपचे शहर मंडळ अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, प्रमोद गावडे, पंकज पेडणेकर, अमोल टेंबकर, दिलीप भालेकर, सागर ढोकरे, चैतन्य सावंत, अनिकेत आसोलकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.