
मालवण : तालुका विधी सेवा समिती आणि नांदोस ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने नांदोस येथे राबविण्यात आलेल्या कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम व मोहीमेस ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश क स्तर अमरदीप तिडके, वकील संघाचे ज्येष्ठ विधीज्ञ उल्हास कुलकर्णी, विधीज्ञ महेंद्र गोवेकर, सरकारी अभियोक्ता हृदयनाथ चव्हाण, विधिज्ञा प्राजक्ता गावकर, विधीज्ञ प्रदीप मिठबावकर, विधिज्ञा अक्षया वराडकर यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शक व्यक्ती म्हणून काम पाहिले. सुरुवातीला विधीज्ञ प्रदीप मिठबावकर यांनी १२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या लोक अदालतीचे महत्त्व काय आहे याबाबत उपस्थित ग्रामस्थांना माहिती दिली. त्याचप्रमाणे लोक अदालत बाबत तडजोडीने दावे कसे निकाली काढतात याची माहिती दिली. त्यानंतर वादपूर्व प्रकरणे न्यायालयात दाखल करून लोक अदालतीमध्ये तडजोडीने निकाली काढली जातात याची माहिती दिली. विधीज्ञ श्रीमती वराडकर यांनी मृत्युपत्र, बक्षीसपत्र कसे करावे. मृत्युपत्राबाबतची कायदेशीर माहिती उपस्थित ग्रामस्थांना दिली. महिलांबाबतचे कायदे व त्यांचे हक्क, रोजगारासंबंधी असणाऱ्या कायद्याची माहिती त्यांनी दिली. सरकारी अभियोक्ता श्री. चव्हाण यांनी उपस्थित ग्रामस्थांना न्यायालयीन प्रक्रिया, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया, अटक केलेल्या व्यक्तीचे अधिकार याची माहिती दिली. श्री. गोवेकर यांनी पुराव्याच्या कायद्यासंबंधी तसेच रस्ते अपघातात मृत्यू झाल्यास विमा कंपन्यांकडून कायद्याप्रमाणे आर्थिक नुकसान भरपाई मृतांच्या वारसांना कशाप्रकारे मिळू शकते याची माहिती दिली.
ज्येष्ठ विधीज्ञ श्री. कुलकर्णी यांनी ग्रामपंचायत अधिनियमाद्वारे ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालतो याची माहिती दिली. नालसा बद्दलची माहिती, उद्दिष्टे, त्याचबरोबर भारतातील ज्येष्ठ नागरिकांचे हक्क, अधिकार याचे कायदे, लहान मुलांचे शिक्षण, आरोग्या बाबतचे अधिकार, कायदे,महिलांविषयक कोणते कायदे आहेत याबाबत मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणाबाबतच्या कायद्याची विस्तृत माहिती देण्यात आली.
न्यायाधीश श्री. तिडके यांनी माहिती, तंत्रज्ञान अधिनियम, सायबर गुन्ह्यांबाबत असलेले कायदे, तंत्रज्ञानाद्वारे गुन्हेगार एखाद्या व्यक्तीला गंडा घालतात त्यामुळे होणाऱ्या नुकसानीपासून आपण कसा बचाव करायला हवा याची माहिती दिली. वादपूर्व प्रकरणे न्यायालयात दाखल करून लोक अदालतीमध्ये तडजोडीने निकाली काढली जातात याची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर नालसा बद्दलची माहिती व उद्दिष्टे याचीही त्यांनी माहिती दिली.
१२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या लोक अदालतीमध्ये तडजोडीने खटले निकाली काढले जावेत यासाठी जास्तीत जास्त खटले लोक अदालतीमध्ये ठेवण्यात यावे असे आवाहन करण्यात आले. ग्रामस्थांना लोक न्यायालयाच्या जनजागृतीसाठी माहिती पत्रके देण्यात आली. कार्यक्रमास ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.