
मालवण : महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेत महिलांना दरमहा १५०० रुपये शासनाच्या वतीने दिले जाणार आहेत. या योजनेचा लाभ जास्तीती जास्त महिलांना व्हावा यासाठी आचरा भाजपने पुढाकार घेतला आहे. आयोजित केलेल्या शिबिरात आचरा वरची वाडी येथे 228 तर आचरा गाऊडवाडी येथे 188 असे एकूण आचरा गावात 416 महिलांची ऑफलाईन स्वरूपात नोंदणी आचरा गावात पूर्ण झाली आहे. या उपक्रमाला भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी भेट देत जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या सूचना केल्या.
महिलांना सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे, महिलांना सशक्तीकरणासाठी चालना देणे अश्या महिलांवर अवलंबित मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने "मुख्यमंत्री माझी बहीण योजना" आणली आहे. या योजनेचा आचरे गावातील जास्तीत जास्त महिलांना लाभ होण्यासाठी आचरे भाजपने पुढाकार घेतला आहे. पहिल्याच टप्प्यात 416 हून जास्त महिलांची नाव नोंदणी झाली आहे. यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, आचरे ग्रामपंचायत सरपंच जेरॉन फर्नांडीस, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजन गावकर, बाबू परुळेकर, विजय कदम यासह अन्य उपस्थित होते. सदर नोंदणी केलेले अर्ज अंगणवाडीत सुपूर्द करण्यात आले.