
ओरोस : 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' राबवण्यासाठी ओरोस ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या ग्रामसभेला पावसाचे वातावरण असतानाही ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी ग्रामसेवक अनिल चव्हाण यांनी ग्रामस्थांना योजनेचे महत्त्व आणि बक्षिसे मिळवण्यासाठी काय करावे लागेल, याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी हे अभियान कसे महत्त्वाचे आहे, हे समजावून सांगितले.
या सभेमध्ये सुप्रिया वालावलकर यांनी आपल्या मताची मांडणी करताना सांगितले की, "या अभियानाचा फायदा घेऊन आपण पाणंद रस्त्यांसारखी विकासकामे करायला हवीत. सरकारने सुरू केलेली ही चांगली मोहीम असून, आपण सर्वांनी एकत्र येऊन गावाचा विकास साधला पाहिजे."
सरपंच सौ. आशा मुरमुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. "गावाचा विकास कुणी एकाने नाही तर सर्वांनी मिळून करायचा असतो," असे त्या म्हणाल्या. सरपंच मुरमुरे यांनी गावातील घनकचरा व्यवस्थापनाचा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत, "गावातील घनकचऱ्याच्या समस्येवर सर्वांनी मिळून उपाय काढायला हवा. आपले गाव स्वच्छ ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे," असे आवाहन केले. त्यांनी ग्रामस्थांना स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करत, "तुमचा सहभाग महत्त्वाचा आहे. तुम्ही काम करायला सांगा, आम्ही तयार आहोत. पण तुम्हीही कामात सहभागी होऊन आपल्या गावाचा एक तरी नंबर या स्पर्धेत काढूया," असे सांगितले.
या सभेला सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यातून गावाच्या विकासासाठी आणि स्वच्छतेसाठी एकत्र येण्याची भावना दिसून आली.