संत संगतीत शाश्वत आनंद !

बाकी सर्व क्षणीक सुख : प.पू.शोभाताई
Edited by: विनायक गांवस
Published on: March 04, 2024 05:34 AM
views 88  views

सिंधुदुर्ग : देवदेवतांची भक्ती, सगुणभक्ती वाया जात नाही. देवतांच्या पूजेनंतर हे देव चालत्या बोलत्या संतांची भेट घालून देतात. सत्संगात खरा आनंद आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ सत्संगात घालवला पाहिजे. ईश्वर सेवेत परमानंद असून बाकी सर्व क्षणीक आहे असा उपदेश कणेरी कोल्हापूरचे २६ वे मठाधिपती सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराजांच्या शिष्या प. पु. शोभाताई माऊली यांनी केला. शनिवारी नाटळ येथील सत्संग सोहळ्यात भक्तजनांना प्रवचनातून संबोधित करताना त्या बोलत होत्या. 


कणकवलीतील नाटळ येथील गणेश मंदिरात श्री समर्थ सद्‌गुरु काडसिद्धेश्वर स्वामी महाराज सत्संग सोहळा शनिवारी श्री स्वामी महाराजांच्या दिव्य दर्शनानं व नामाच्या जयघोषात पार पडला. २६ वे मठाधिपती सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराजांच्या शिष्या प. पु. शोभाताई माऊली यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्संग सोहळा संपन्न झाला. मोठ्या संख्येने भक्तजन यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी प.पू. शोभाताई म्हणाल्या, मानव म्हणून जन्माला आल्यानंतर त्याच सार्थक कसं करावं ? हे अद्याप आपल्याला ठावूक नाही आहे. नरदेहाच उचीत म्हणजे आत्महीत साधणं आवश्यक आहे. आपल्याला सद्गुरू शोधता आले पाहिजे, त्यांच्याकडून न्यानप्राप्ती केली पाहिजे. साधकान विचार करायला पाहिजे. दिवसभर आपण विचार करतो. पण, त्याला विचार म्हणत नाही. विचार हा आहे मी आलो कुठून, मी जाणार कुठे ?, माझं कर्तव्य काय, देवाला कसं ओळखायच, परमेश्वराची कृपा कशी करून घ्यायची ? या सगळ्या प्रश्नांची उत्तर याच जन्मात मिळाली पाहिजेत, पुढच्या जन्मात नाही. पुढच्या जन्मी करू म्हणणाऱ्यांना ज्ञानेश्वर माउलींनी महामुर्ख म्हंटलं आहे. 


संतांनी जगाकडे पाठ केली असून ईश्वराकडे तोंड केलेलं आहे. परमेश्वराची प्राप्ती होत नाही तोवर ते शांत बसत नाहीत. त्यामुळे संतांच्या सहवासात वेगळीच 'एनर्जी' आहे. ही उर्जा कुठलं एनर्जी ड्रींक पिऊन नाही तर संत सहवासात येते. ती सांगता येत नाही अनुभवावी लागते. ही उर्जा दिवसेंदिवस वाढली पाहिजे. ॐ व्हॅल्यू अर्थात परमात्मा आपल्याला कळला पाहिजे. तो जर कळला आणि प्राप्त झाला तर कसलीच चिंता करायची गरज नाही. यासाठी संसार त्याग करायची गरज नाही. योग्य विचार करण्याची गरज आहे. देवदेवतांची भक्ती, सगुण भक्ती आपण करतो. ही भक्ती वाया जात नाही. सगळ्या देवतांची पूजा केल्यानंतर हे देव चालत्या बोलत्या संतांची भेट घालून देतात. सत्संगात खरा आनंद आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ सत्संगात घालवला पाहिजे. ईश्वर सेवेत खरा आनंद, बाकी सर्व क्षणीक आहे असा उपदेश प.पू‌. शोभाताईंनी केला. संध्याकाळी भजन, पादुका मिरवणूक,पुजा, सुस्वर भक्तीगीते, प्रवचन, दासबोध वाचन, आरती अशा आध्यात्मिक कार्यक्रमांनी हा संत्संग पार पडला. या प्रसंगी मोठ्या संख्येने गुरुभक्त व भाविक उपस्थित होते.