
सावंतवाडी : सावंतवाडी-शिरोडा मार्गावरील सालईवाडा येथे शनिवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. एका अल्पवयीन चालकाने आपल्या ताब्यातील भरधाव इनोव्हा कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या जनरेटर व्हॅनला आणि मंगल कार्यालयाच्या भिंतीला जोरात धडकवून मोठे नुकसान केले. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित आरोपीची इनोव्हा जप्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ जानेवारी २०२६ रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. इनोव्हा (MH 04 FA 4554) या वाहनावरील अल्पवयीन चालकाने आपले वाहन सावंतवाडीकडून शिरोड्याच्या दिशेने अत्यंत वेगाने चालवले होते. सालईवाडा येथील रवींद्र मंगल कार्यालयासमोर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टाटा २०७ डी. आय जनरेटर व्हॅन (MH 10 K 7727) ला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की जनरेटर व्हॅनचे नुकसान करून ही कार थेट मंगल कार्यालयाच्या दर्शनी भागातील विटांच्या कंपाउंडच्या भिंतीवर जाऊन आदळली. यामध्ये भिंतीचेही मोठे नुकसान झाले आहे.
अपघातानंतर अल्पवयीन चालक घटनास्थळावरून पळून गेला. त्याला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी आनंद मिस्त्री (आरोपी क्र. २) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मंगल कार्यालयाचे मालक अमित रवींद्र आरवारी (रा. सालईवाडा) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघातातील इनोव्हा कार जप्त केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार अनिल धुरी हे हवालदार महेश जाधव यांच्या मदतीने करत आहेत. भरवस्तीत आणि मुख्य रस्त्यावर रात्रीच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.










