
सावंतवाडी : ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल (JCI) सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोंसले यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली. यावेळी युवराज लखमराजे भोसले हे देखील उपस्थित होते.
या भेटीदरम्यान JCI संस्थेची ध्येयधोरणे, युवक सक्षमीकरणासाठी सुरू असलेले उपक्रम तसेच शहरात राबविण्यात येणाऱ्या सामाजिक व विकासात्मक प्रकल्पांची सविस्तर माहिती नगराध्यक्षांना देण्यात आली. JCI सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असून समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून युवकांमध्ये नेतृत्व, सेवाभाव आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
यावर नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांनी JCI च्या कार्याचे कौतुक करत “शहराच्या सामाजिक, शैक्षणिक आणि युवक विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक उपक्रमाला नगरपालिकेकडून पूर्ण सहकार्य राहील” असे आश्वासन दिले.या सदिच्छा भेटीत JCI झोन समन्वयक (झोन ११) JFM सुशांत गोवेकर, JCI सावंतवाडी अध्यक्ष JFM श्रद्धा गोवेकर, सेक्रेटरी JC विनेश तावडे, जनसंपर्क व विपणन संचालक JC सागर चव्हाण, व्यवस्थापन उपाध्यक्ष JC मिस्बा शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.या भेटीमुळे JCI सावंतवाडी व नगरपालिकेतील समन्वय अधिक दृढ होऊन भविष्यात शहराच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यास बळ मिळणार आहे.










