
सावंतवाडी : यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवरील जीपॅट २०२६ परीक्षेत गुणवत्तेची परंपरा कायम राखत उत्तम यश संपादन केले. जीपॅट ही एम. फार्मसी प्रवेशासाठी आवश्यक पात्रता परीक्षा असून या परीक्षेमुळे औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रातील उच्च शिक्षण, संशोधन आणि करिअरच्या विविध संधी विद्यार्थ्यांसाठी खुल्या होतात.
जीपॅट परीक्षा संपूर्ण भारतात विविध केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. या परीक्षेचा मुख्य उद्देश हा विद्यार्थ्यांना देशातील उत्तम महाविद्यालयात प्रवेश मिळावा हा आहे. जीपॅट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे औषधर्माणशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाला (एम. फार्मसी) प्रवेश दिला जातो. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स ने जीपॅट २०२६ चा निकाल ७ एप्रिल २०२६ रोजी जाहीर केला आहे. फार्मसी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या या राष्ट्रीय परीक्षेत महाविद्यालयाच्या ९ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवून महाविद्यालयाचे नाव देशपातळीवर उज्ज्वल केले आहे. साटेली-भेडशी येथील सई मारुती धर्णे हिने जीपेंट (GPAT) या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक परीक्षेत देशात २५ वा क्रमांक (ऑल इंडिया रैंक) पटकावत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. या स्पर्धात्मक परीक्षेत देशभरातून सुमारे ५३,६१७ उमेदवार सहभागी झाले होते. अशा कठीण स्पर्धेत सईने आपल्या जिद्दी, सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर अव्वल स्थान मिळवून महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे. तसेच, अनुक्रमे मंगेश प्रकाश काकडे (३६०), वेदिका भास्कर नाईक (९७३), पोर्णिमा अनिल महाले (१७६४), देवराव चिदंबर प्रभू (२०२१), मिथिला समीर खाडये (३४७९), अपर्णा सत्यवान मोर्जे (३८६६), समिक्षा सुनील मेस्त्री (४७२८), पूर्वा संदेश सावंत (७१४८) यांनीही गुणवत्ता यादीत स्थान मिळवून विशेष कामगिरी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे महाविद्यालयाने दिलेले सातत्यपूर्ण मार्गदर्शन, नियोजनबद्ध अभ्यासपद्धती आणि तज्ज्ञ शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. जीपॅट परीक्षेच्या तयारीसाठी महाविद्यालयात विशेष मार्गदर्शन वर्ग, शंका निरसन सत्रे आणि अभ्यासाचे नियोजन यावर भर देण्यात आला होता. जीपेंट परीक्षेच्या सरावासाठी महाविद्यालयाने वर्षभर घेतलेल्या विशेष तासिका तसेच परीक्षा, अभ्यासाचे नियोजन या बद्दलचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांची मेहनत या मुळेच हे यश प्राप्त झाल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय जगताप यांनी सांगितले. या यशामागे विद्यार्थ्यांना मिळालेले तज्ज्ञ शिक्षक प्रा. डॉ. रोहन बारसे, प्रा. डॉ. तुषार तुकारी, प्रा.डॉ विनोद मुळे, प्रा. गायत्री आठलेकर, प्रा. गौरी भिवशेट यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई, समन्वयक सुनेत्रा फाटक, सी. इ. ओ. ले. कर्नल. रत्नेश सिन्हा, प्राचार्य डॉ. विजय जगताप, अस्पायर क्लबचे समन्वयक प्रा. प्रणिता पवार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. महाविद्यालयाच्या या यशामुळे भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले आहे.











