
सावंतवाडी : शहरात गुरूवारी दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. जवळपास १० वेळा लाईट ये - जा चे प्रकार शहरात सुरू असल्याची नाराजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख शैलेश गवंडळकर यांनी व्यक्त केली.
ऐन उकाड्यात शहरात हा प्रकार पहायला मिळाला. सोमवारी देखभाल दुरुस्तीसाठी ६ तास विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. यानंतर तो सुरळीत केला असताना अवघ्या दोन दिवसांत तब्बल १०हून अधिक वेळा लाईट ये-जाचे प्रकार घडले. यामुळे शहरवासीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत उप कार्यकारी अभियंतांना विचारलं असता ट्रान्सफॉर्मर मध्ये बिघाड झाला असून दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, दोन दिवसांपूर्वी देखभाल दुरुस्तीसाठी विद्युत पुरवठा खंडित करून आजच्या दिवसातील प्रकार बघता महावितरण कंपनीने सोमवारी नेमकी देखभाल कशाची घेतली असा सवाल उपस्थित होत आहे.










