
- संजय दत्तची उपस्थिती, सोनू निगम लाइर्व्ह कॉन्सर्टचेंही आयोजन
- कणकवलीत चोख पोलीस बंदोबस्त
कणकवली :
माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस शुक्रवार, १० एप्रिलला साजरा होत आहे. श्री. राणे यांचा ७४ वा वाढदिवस असून यानिमित्त भाजप व महायुतीतील घटक पक्षांतर्फे अमृत महोत्सवी वर्ष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसारच शुक्रवार, १० रोजी सायंकाळी ६ वा. येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर वाढदिवस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदींची उपस्थितीत असणार आहे. त्यामुळे हो सोहळा न भूतो न भविष्यती होईल, असा विश्वास महायुतीचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
नारायण राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सवी वर्ष सोहळा साजरा केला जाणार असल्याची घोषणा महायुतीच्या पददाधिकार्यांतर्फे गुरुवारी कणकवली येथे पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली होती. त्यानुसार उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. या ठिकाणी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून लाईट्स व इतर व्यवस्था करण्यात आली आहे. महनीय व्यक्ती या सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याने त्यांच्यासाठी विशेष आसन व्यवस्थाही करण्यात आली आहे.
सोहळ्यास मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासह राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेपाटील, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मंत्री उदय सामंत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे यांच्यासह राज्यभरातील अनेक मंत्री, आमदार, विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.
राणे यांना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देण्याऐवजी भेट म्हणून पुस्तक द्यावे, असे आवाहन महायुतीच्या पदाधिकार्यांनी केले आहे. पुस्तकाची भेट स्विकारण्यासाठी विशेष व्यवस्थाही करण्यात आली असून त्यासाठी सोहळ्याच्या प्रवेशद्वारानजीक सेल्फी पॉईंटही उभारण्यात आले आहेत. हा सोहळा सिंधुदुर्गच्या इतिहासातील लक्षवेधी क्षण ठरेल, असा विश्वास महायुतीचे कार्यकर्ते करत आहेत.
सोनू निगम लाईव्ह कॉन्सर्ट प्रमुख आकर्षण
वाढदिवस सोहळ्यास प्रसिद्ध सिने अभिनेते संजय दत्त यांचीही उपस्थिती असणार आहे. संजय दत्त हे रसिकांसमोर काही 'डायलॉग'ही सादर करणार आहेत. विशेष म्हणजे हिंदी सिने विश्वातील प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम यांची लाईव्ह कॉन्सर्ट रसिकांना विशेष मेजवानी ठरणार आहे.
कणकवलीत चोख पोलीस बंदोबस्त
नारायण राणे यांच्या वाढदिवस सोहळ्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक मंत्री आमदार उपस्थित राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात ठीक ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुरुवारी सायंकाळी अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी सोहळा स्थळाची पाहणी केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, कणकवलीचे पोलीस निरीक्षक तेजस नलावडे हे देखील उपस्थित होते.










