
वेंगुर्ला : तालुक्यातील परुळे बाजारपेठत जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचा भव्य दर्शन व पादुका पूजन सोहळा मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात झाला. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते. सोहळ्याची सुरुवात भव्य मिरवणुकीने करण्यात आली. सजवलेल्या रथातून सिद्ध पादुका ढोल-ताशांच्या गजरात वाजत - गाजत कार्यक्रमस्थळी आणण्यात आल्या. या मिरवणुकीत विविध आकर्षक चित्ररथ सहभागी झाले होते. ज्यामुळे वातावरण भक्तिमय आणि उत्साही बनले.
पादुकांची स्थापना झाल्यानंतर पूजन विधी पार पडला. यानंतर रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. गरीब व गरजू शेतकऱ्यांना हापूस आंब्याची एकूण १२०० कलमे मोफत वितरित करण्यात आली. सुमारे २५० शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हापूस आंब्याची रोपे देण्यात आली.
या प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, वेंगुर्ला पंचायत समिती उपसभापती सचिन देसाई, पंचायत समिती सदस्य विष्णू फणसेकर, परुळे बाजारपेठ सरपंच प्रतीती आंबडगावकर, सरपंच निलेश सामंत, माजी सरपंच (चिपी) साईनाथ माडये, प्रसाद पाटकर पादुका दर्शन सोहळा प्रमुख, दिलीप सोमदे, उपपीठ प्रमुख दीपक खरुडे, जिल्हा निरीक्षक राजीव कुडके, जिल्हा प्रमूख विलास परब, दिनेश मुंबर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना मनीष दळवी यांनी जगद्गुरुंच्या सामाजिक व आध्यात्मिक कार्याचे कौतुक केले. शेतकऱ्यांनी या हापूस आंब्याच्या कलमांची योग्य जोपासना केल्यास भविष्यात चांगले उत्पन्न मिळू शकते, असे त्यांनी सांगितले. तसेच सचिन देसाई यांनीही रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या समाजोपयोगी कार्याचा गौरव केला.
या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांसाठी पाणी व महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. सिद्ध पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. संपूर्ण कार्यक्रम भक्ती, उत्साह आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम ठरला.











