गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे खास आभार

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: July 18, 2024 11:45 AM
views 336  views

सिंधुदुर्गनगरी :  कोकणातील तीनही लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड आणि मावळ या तीनही मतदारसंघाची जबाबदारी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर पक्षाने दिली होती. त्यांनी घेतलेल्या निर्णायक भूमिकेमुळे भाजपाला संधी मिळाली आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये तब्बल ४० वर्षांनी कमळ फुलले आहे. याबद्दल भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा लोकसभा प्रभारी अतुल काळसेकर व सहप्रभारी तथा माजी आमदार बाळ माने यांनी प्रमोद सावंत यांची आज पणजीत भेट घेऊन आभार मानले. खासदार नारायण राणे यांच्या सत्कारासाठी रत्नागिरीत येण्याचे निमंत्रणही दिले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपाने १९८० नंतर प्रथमच कमळाच्या निशाणीवर निवडणूक लढवली. भाजपला ही जागा मिळण्याकरिता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रत्नागिरीचा दौरा केला होता. त्यावेळीच कार्यकर्त्यांना ग्वाही दिली होती की ही जागा आपल्याला मिळणार व आपण जिंकणार. त्याप्रमाणेच झाले. रायगड, मावळ येथेही महायुतीचे उमेदवार विजयी झाले. १०० टक्के यश मिळवल्याबद्दल प्रमोद सावंत यांचे विशेष अभिनंदन बाळ माने यांनी केले. याप्रसंगी श्री. काळसेकर, श्री. माने यांच्यासमवेत सिंधुदुर्ग भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, मिहिर माने, बंड्या सावंत या वेळी उपस्थित होते.

लोकसभा मतदारसंघाचे क्लस्टर प्रमुख आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी लोकसभेचे विश्लेषण करताना मुख्यमंत्री सावंत यांना सांगितले की, तिन्ही लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असलेल्या विधानसभा मतदारसंघानी निर्णायक भूमिका बजावली. रायगडमध्ये भाजपच्या पेण विधानसभा मतदासंघाने तब्बल ५१००० हजाराचे मताधिक्य सुनील तटकरे यांना देऊन खासदार म्हणून निवडले. तटकरे यांच्या विजयात भाजपने मोठा वाटा उचलला. मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपचे मावळ, पनवेल आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांमध्ये निर्णायक आघाडी घेऊन शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्या विजयामध्ये निर्णायक आघाडी दिली. पुन्हा एकदा रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाच्या वतीने सत्कार करण्यासाठी निमंत्रण देण्यात आले.