
दोडामार्ग : महाराष्ट्र राज्यातील कलाकारांच्या हितासाठी कार्य करणाऱ्या शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने कलाकारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून, त्या अनुषंगाने रविवार दि.४ जानेवारी रोजी दुपारी ३ वा. दोडामार्ग येथील भेडशी रोडवरील गणपती मंदिरात कलाकारांची विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.
या प्रतिष्ठानचे मुख्य उद्दिष्ट कलाकारांना शासनस्तरावर न्याय मिळवून देणे हे असून, त्यामध्ये स्वतंत्र संगीत कलाकार ओळखपत्र, विशारद पदवीधारक कलाकारांना शाळांमध्ये संगीत शिक्षक म्हणून नियुक्ती, कलाकारांसाठी अपघाती विमा व वैद्यकीय सुविधा, शासन व सांस्कृतिक संचालनालयाच्या लाभदायक योजना राबविणे, तसेच भजनी बुवा व पखवाज वादकांप्रमाणे कोरस, टाळ-झांज वादकांनाही पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात संगीत कलादालन उभारण्याचा संकल्प प्रतिष्ठानने केला आहे. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग सर्व कला उत्कर्ष मंडळाच्या स्थापनेसाठी दोडामार्ग तालुक्याची पहिल्या तालुक्याप्रमाणे निवड करण्यात आली आहे.
या सभेसाठी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सिंधुरत्न भजनसम्राट भालचंद्र केळूसकर बुवा तसेच शरद शारदा प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पखवाज अलंकार महेश सावंत हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या वेळी कलाकारांची आजीवन सभासद नोंदणी करण्यात येणार असून, इच्छुक कलाकारांनी आधार कार्डची झेरॉक्स प्रत, एक पासपोर्ट साइज फोटो व २०० रुपये सभासद शुल्क घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष महेश सावंत यांनी केले आहे.










